
बाळ तोरसकर,[email protected]
ज्युदोचा सराव व लढती पारंपरिक वेश परिधान करून करत असतात. खेळाडूने केलेल्या वेगवेगळ्या कामगिरीच्या जोरावर त्याला वेगवेगळे पट्टे देऊन गौरविले जाते.
आपण मागच्या लेखात आत्मसंरक्षणासाठी ज्युदो हा खेळ कसा उपयोगी पडतो हे पाहिले. या खेळाला तसं बघायला गेलं तर हिंदुस्थानात महाराष्ट्राने मोलाचे योगदान दिले आहे. जपानमध्ये ज्युदोचे प्रशिक्षण घेऊन परतलेल्या रघुनाथ दामोदर खाणीवाले यांनी 1940 पासून हिंदुस्थानात व विशेषतः महाराष्ट्रात प्रसार केला. त्यांना एन. टी. बंगेरा यांनी मोलाची साथ दिली. त्यानंतर एल. के. डागा या कार्यकर्त्याने ज्युदो या खेळाला विशेष स्थान मिळवून देताना 1986 ला हिंदुस्थानी संघाला आशियाई स्पर्धेत स्थान मिळवून दिले. त्या स्पर्धेत रवींद्र पाटील या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी संघाने 4 कास्य पदके मिळवत ज्युदो खेळाला वलय मिळवून दिले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतसुद्धा हिंदुस्थानने आपला वाटा दाखवून दिला. ज्युदो हा खेळ म्हणून तर प्रसिद्ध तर आहेच, त्याचबरोबर आत्मसंरक्षणासाठीही हा खेळ उपयोगी पडत असल्याने या खेळाला वेगळेच महत्त्व मिळताना दिसत आहे. मुलांसाठी व मुलींसाठी या खेळाच्या विविध वजनी गटांच्या स्पर्धा होताना आपल्याला दिसून येतात. या खेळात सामन्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन पंच असतात. त्यापैकी एक पंचप्रमुख तर दोन पंच सामन्यावर लक्ष ठेवून असतात. आताच्या नवीन नियमांनुसार मिश्र गटात मुलांच्या आणि मुलींच्या गटात खेळाडू त्या-त्या गटात आमने सामने येऊन मिश्र गटाच्या विजेतेपदासाठी झुंजतात.
सध्या पंजाबचा अवतार सिंग, उत्तर प्रदेशचा विजय यादव, मणिपूरची कल्पना देवी, हरप्रीत सिंग हे खेळाडू वरिष्ठ गटात आघाडीवर आहेत, तर ज्युनियर गटात रोहिणी मोहिते, स्नेहल खवरे, श्रवण शेडगे, शुभांगी राऊत आदी खेळाडू चमकदार कामगिरी करत ज्युदो या खेळाचे नाव मोठे करत आहेत. महाराष्ट्रात जवळ जवळ प्रत्येक जिह्यात ज्युदो खेळाचे प्रशिक्षण दिले जाते, तर मुंबईत बॉम्बे ज्युदो क्लब- अंधेरी, पोदार ज्युदो क्लब, श्री समर्थ व्यायाम मंदिर-शिवाजी पार्क, इप्पोन ज्युदो ऍकॅडेमी-वरळी, युनायटेड ज्युदो ऍकॅडेमी आदी क्लब आघाडीवर आहेत. ज्युदो खेळात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय अशा नियमित स्पर्धा होत असल्या तरी मुंबई शहर व उपनगर हे राज्य स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेत तर खेळतातच, त्याचबरोबर मुंबई शहर व उपनगरचे खेळाडू थेट राष्ट्रीय स्पर्धेतसुद्धा खेळू शकतात व तशी तरतूद या खेळात सुरुवातीपासून असल्याने प्रत्येकवर्षी मुंबईतून थेट खेळाडू पाठवतात.
खरं तर ज्युदोचा सराव करणारे खेळाडू व्यायामासाठी, आवड म्हणून व आत्मसंरक्षणासाठी सराव करताना आढळतात. ज्युदोचा सराव व लढती पारंपरिक वेश परिधान करून करत असतात. या कॉटनच्या वेशभूषेस ज्युदोगी असे संबोधले जाते. या वेशभूषेत वर शरीरावर डगला परिधान केला जातो तर पायात पायजमा घातला जातो व त्यावर पट्टा बांधला जातो. या खेळात बूट वापरले जात नाहीत. ज्युदोचा खेळाडू गुण मिळवताना वेगेवेगळ्या पद्धतीने गुण वसूल करत असतात यामध्ये प्रतिपक्षाला पाठीवर घेऊन चांगल्या पद्धतीने फेकून देणे, प्रतिपक्षाची पाठ जमिनीवर टेकवून 30 सेकंद पकडून ठेवणे, प्रतिपक्षाला अडकवून त्यास हालचाल करण्यास न देणे व त्यास सोडवणुकीसाठी याचना करायला भाग पाडणे, प्रतिपक्षाच्या हाताच्या कोपऱयात वा खांद्यात अडकवून गुण वसूल केले जातात. विविध युक्त्यांचा वापर केला जातो.मात्र या प्रकारात ज्युडोकास लाथा मारणे अथवा मुष्टीप्रहार करण्यास परवानगी नसते.
यात खेळाडूने केलेल्या वेगवेगळ्या कामगिरीच्या जोरावर त्याला वेगवेगळे पट्टे देऊन गौरविले जाते. त्यात प्राथमिक गटात पांढरा, पिवळा, नारंगी, हिरवा, निळा व तपकिरी पट्टा दिला जातो, तर उच्च स्तरावर काळा पट्टा, तांबडा व मध्ये पांढरा असलेला पट्टा व तांबडा पट्टा दिला जातो. जिथे ज्युदोचा सराव केला जातो त्या ठिकाणाला किंवा जागेला डोजो असे म्हटले जाते. या ठिकाणी मुले-मुली असा भेद केला जात नाही. सुरुवातीला ज्युदोचा सराव एकटय़ाला करता येतो. मात्र प्राथमिक भाग वगळता या खेळात सराव करताना नेहमीच प्रतिस्पर्धी खेळाडूची गरज लागते. नमस्कार करणे किंवा नतमस्तक होणे यास या खेळात खूपच महत्त्वाचे स्थान आहे. उभ्याने, वाकून, बसून, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने नमस्कार केले जातात. डोजोमध्ये सरावास सुरुवात करताना व सराव संपल्यावर दोन्ही वेळा नमस्कार केला जातो.त्यामुळेच या खेळात एक प्रकारची शिस्त असल्याचे लक्षात येईल.
या खेळात सराव करताना शरीराला थांबवत पाडणे, विविध स्थितीत उभे राहणे, सरळ चाल करत डावे-उजवे पाऊल टाकणे, लांब पावले पाठोपाठ टाकणे, योग्य पकड व ताबा घेणे व विविध तंत्र-पद्धती वापरत ज्युदो खेळाचा सराव केला जातो. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून योग्य सराव केल्यास उत्तम ज्युदो खेळाडू बनणे सहज शक्य होते. याच सरावाच्या जोरावर आपण आत्मसंरक्षण करण्यास सक्षम होऊ शकतो.

























































