
जम्बो कोविड सेंटरच्या सेवा पुरवण्यात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत ‘सरकारी दबावा’खाली सुरू झालेल्या ‘ईडी’ छापेमारीविरोधात पालिका युनियननी दंड थोपटले आहेत. या प्रकरणात पालिका अधिकाऱ्यांना नाहक गोवण्याचा हा प्रयत्न असून ही छापेमारी ताबडतोब थांबवली नाही, तर ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा इंजिनीअर असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे सरकारही ‘बॅकफूट’वर गेले असून अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ केले जाणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येसाठी पालिका आणि सरकारी बेड कमी पडू लागल्याने मुंबईत दहा जम्बो कोविड सेंटरचे नियोजन करण्यात आले. यामध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या गरजेनुसार सात जम्बो कोविड सेंटर प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात आले. या जम्बो कोविड सेंटरच्या सात हजारांवर बेडच्या माध्यमातून तब्बल दोन लाख कोरोनाग्रस्तांना जीवनदान मिळाले. मात्र या जम्बो कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय साहित्य आणि इतर सेवा पुरवण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधकांकडून करण्यात येत आहे. राज्यात गद्दारीनंतर झालेल्या सत्ताबदलानंतर या आरोपांवरून ‘ईडी’कडून छापेमारीदेखील सुरू झाली आहे. या कारवाईत सरकारविरोधात बोलणाऱ्यांना टार्गेट केले जात असून आता पालिका अधिकाऱ्यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. यामध्ये पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह उपायुक्त रमाकांत बिरादार, डॉ. हरीश राठोड यांच्या घरावर ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली. याविरोधात आता पालिकेतील युनियनही आक्रमक झाल्या आहेत.
…तर ‘ईडी’ कार्यालयावर आंदोलन
कोरोना काळात पालिका कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी काम केले. पालिकेच्या या कोरोना लढय़ात तब्बल 282 कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. असे असताना कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता ‘ईडी’कडून पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत असून ते तणावात असल्याचे युनियनच्या प्रकाश जाधव यांनी सांगितले. हा प्रकार थांबला नाही, तर ‘ईडी’ कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

























































