अरण्य वाचन…कर्नाटकात चला!

91

अनंत सोनवणे,[email protected]

कर्नाटकातील दांडेली अभयारण्य. अत्यंत दुर्मिळ ब्लॅक पॅन्थर, वाघोबा, देखणा महाघनेश… दांडेलीच्या जिवंत वैभवाविषयी काय सांगावे…

कर्नाटक हे जंगलांनी व्यापलेलं राज्य. नक्षलवादी, तस्कर, शिकारी या साऱयांचा सामना करीत या  राज्यानं आपली वनसंपदा चांगलीच जतन केली. दांडेली हे या वनसंपदेतलं प्रमुख रत्न. घनगर्द जंगल, संपन्न वृक्षवैभव, सुदृढ वन्यजीवन, व्यापक पक्षीजीवन यामुळे दांडेली निसर्गप्रेमींच्या बकेट लिस्टमध्ये अग्रस्थान पटकावतं. काली नदीच्या काठावर वसलेलं हे अभयारण्य कर्नाटकातलं दुसऱया क्रमांकाचं मोठं अभयारण्य आहे. इथल्या जंगलात विविध प्रकारचे वृक्ष आढळतात.  सदाहरित वृक्षांमध्ये हे जंगल सदैव हिरवं दिसतं.

panther-2

दांडेली अभयारण्य हे त्यातल्या अतिवैशिष्टय़पूर्ण वन्यजीवनामुळे  ओळखलं जातं. जंगलचा राजा वाघ इथं वास करतो.  शिवाय छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचा विषय असलेला आणि सहसा कुठेही न दिसणारा ब्लंक पँथर हा दांडेलीची शान आहे. हिरव्या गर्द पार्श्वभूमीवर त्याचा चमकदार काळा रंग अगदी उठून दिसतो. तसंच बिबळय़ा, अस्वल, जंगली कुत्रे, रानडुक्कर, माकडं, हरणं, मुंगूस मगर, भेकर, लांडगा हे प्राणीही इथं पाहायला मिळतात. दांडेलीत खऱया अर्थानं राज्य चालतं ते हत्तींचं. हत्तींचे मोठमोठाले कळप दांडेलीच्या आसपासच्या महामार्गावरही कधीकधी ‘रास्ता रोको’ करतात. 2015 मध्ये दांडेलीला हत्तीप्रकल्प म्हणून मान्यता मिळाली. फळांनी डवरलेल्या इथल्या वृक्षांवर बागडणारा शेकरू कधी आपल्याला भूल पाडतात तर कधी अतिशय दुर्मिळ असं खवले मांजर आपल्याला आडवं जातं. तुमचं नशीब जोरावर असेल तर नागराज किंग कोब्रा तुमच्यासमोर प्रकट होऊ शकतो! दांडेलीत भटकताना तुमचा कोणता क्षण ‘एन्कॅश’ होईल, हे सांगता येत नाही!

पक्षीप्रेमींसाठी तर दांडेली म्हणजे जणू कुबेराचा खजिनाच. इथं पक्षांच्या दोनशेहून अधिक जाती पाहायला मिळतात. महाधनेश आणि मलबार पाईड धनेश हे या पक्षी जगताची जान आहेत. आम्हाला तर अभयारण्यातून बाहेर निघाल्यावरही महाधनेशचं दर्शन झालं होतं. वैशिष्टय़पूर्ण लांब चोच अभिमानाने मिरवणारा, मोठय़ा आवाजानं लक्ष आकर्षून घेणारा, आकारानं मोठा असा हा देखणा पक्षी त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहायला मिळणं हा अवर्णनीय आनंदाचा क्षण असतो. याशिवाय इथं स्वर्गीय नर्तक, निळय़ा गळय़ाचा तांबट, बहिरी ससाणा, विविध प्रकारचे गरूड व घुबड असे अनेक प्रकारचे पक्षी पहायला मिळतात. आपल्यासारख्या शहरी लोकांसाठी दिवसाची अशी प्रसन्न सुरुवात म्हणजे निव्वळ आनंदनिधान!

birds-24

एका परिपूर्ण जंगलाचं ओझरतं का होईना पण सुरेख दर्शन घडवणारा. रस्ते, रेल्वे आणि वायूमार्गानंही दांडेली सहज जाता येण्यासारखं जंगल आहे. जंगलापर्यंतचा प्रवासही सुखावह आहे. राहण्याची उत्तम व्यवस्था आहेच. शहरातल्या दैनंदिन धावपळीपासून थोडं दूर जाऊन निसर्गाशी खरोखर एकरूप व्हायचं असेल तर दांडेलीला एकदा तरी जायलाच हवं.

दांडेली वन्यजीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…वाघ, ब्लॅक पॅन्थर, किंग कोब्रा

जिल्हा…उत्तर कन्नडा

राज्य…कर्नाटक

क्षेत्रफळ…834 चौ.कि.मी.

निर्मिती…1956

जवळचे रेल्वेस्थानक…अलनावर (32 कि.मी.), लोंढा (48 कि.मी.)

जवळचा विमानतळ…हुबळी (75 कि.मी.)

निवास व्यवस्था…वन विभागाचे कॅम्प, खाजगी हॉटेल्स

सर्वाधिक योग्य हंगाम…मार्च ते ऑक्टोबर

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही

 

 

आपली प्रतिक्रिया द्या