
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुणतांबा येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत विविध मागण्यांचे 16 ठराव मंजूर करण्यात आले असून, सरकारने या मागण्यांची पूर्तता न केल्यास 1 जूनपासून धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सरपंच धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत ‘किसान क्रांती’च्या बॅनरखाली शेतकरी प्रश्नांवर सोमवारी (दि. 23) चर्चा झाली. ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची प्रत सरकारला पाठविण्यात आली आहे. राहाता तहसीलदारांना उद्या ठरावांचे निवेदन देण्यात येणार आहे.
ऊसपिकाला एकरी एक हजार रुपये अनुदान द्यावे, शिल्लक ऊसपिकाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावेत, कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा, कांद्याला प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान द्यावे, शेतकऱयांना दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी, थकीत वीज बिल माफ झाले पाहिजे, कांदा आणि गव्हाची निर्यातबंदी उठवावी, सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी, त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा, 2017 सालच्या कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, नियमित कर्ज भरणाऱयांचे अनुदान दिले जावे, दुधाला उसाप्रमाणे एफआरपी लागू करावी, दुधाला कमीत कमी 40 रुपये दर दिला जावा, खासगी दूधसंकलन केंद्रांतील लूट थांबवावी, वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी, शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावेत, वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमिनी नावावर करून द्याव्यात आदी ठराव करण्यात आले आहेत.


























































