कुणी दुखावेल का, याचा विचार न्यायाधीशांनी करू नये! निवृत्त होताना न्यायमूर्ती अभय ओक यांचा संदेश

आपण लोकप्रिय बनण्यासाठी न्यायाधीश बनत नसतो. आपल्या निर्णयामुळे कुणी दुखावेल का याचा विचार न्यायाधीशांनी करता कामा नये, असा मौलिक संदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी शुक्रवारी निवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभात दिला. न्यायदानाचे कर्तव्य बजावताना अनेकदा वकिलांबाबत कठोर भूमिका घ्यावी लागते. संविधानाचे पालन करण्यासाठी मीही कठोर वागलो, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

न्यायमूर्ती अभय ओक हे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. दिल्लीत त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई, सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्ती, ज्येष्ठ वकील आदी मान्यवर उपस्थित होते. न्यायमूर्ती ओक यांच्या मातोश्रींचे बुधवारी रात्री निधन झाले. मातोश्रींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून ते दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात परतले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठsचे उपस्थित मान्यवरांनी काwतुक केले. त्यावर उत्तर देताना न्यायमूर्ती ओक यांनी आपल्याला निवृत्ती शब्दाचा तिटकारा असल्याचे नमूद केले. मी जानेवारी महिन्यापासूनच शक्य तितक्या प्रकरणांची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एका महान न्यायमूर्तींचा सल्ला सांगितला. मी कदाचित दोन वकिलांना दुखावले असेल. पण मला वाटते की, न्यायाधीशांनी अतिशय ठाम असायला हवे. आपल्या निर्णयामुळे कुणी दुखावेल का, याचा विचार करता कामा नये. एका महान न्यायमूर्तींनी मला एकदा सल्ला दिला होता की, आपण लोकप्रिय होण्यासाठी न्यायाधीश झालेलो नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. मी त्या सल्ल्यानुसार वागलो, असे न्यायमूर्ती ओक म्हणाले. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायमूर्ती ओक यांच्यासोबतच्या दीर्घकाळ मैत्रीची आठवण करून दिली.

सुप्रीम कोर्ट संवैधानिक स्वातंत्र्य टिकवणारे कोर्ट

सर्वोच्च न्यायालय हे एक असे न्यायालय आहे, जे संवैधानिक स्वातंत्र्य टिकवून ठेवणारे न्यायालय आहे. हे संविधान निर्मात्यांचे स्वप्न आहे. मी प्रामाणिकपणे ते स्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला. यापुढे हाच सामूहिक प्रयत्न केला जाईल, याचा मला विश्वास आहे, असे भावनिक उद्गार न्यायमूर्ती ओक यांनी काढले.

निवृत्तीच्या दिवशी तब्बल 11 प्रकरणांचा निकाल

न्यायमूर्ती ओक यांच्या न्यायदानाची सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात विशिष्ट नोंद झाली आहे. त्यांनी आईचे निधन झाले असतानाही न्यायमूर्तीपदाच्या कारकीर्दीतील शेवटच्या दिवशी सर्वोच्च न्यायालय गाठले. मातृछत्र हरपल्याचे दुःख असताना त्यांनी स्वतःला ढळू दिले नाही. उलट निवृत्तीच्या दिवशी तब्बल 11 प्रकरणांचा निकाल जाहीर केला. निवृत्तीआधी शेवटच्या दिवशी काम न करण्याची प्रथा मला मान्य नसल्याचे ते म्हणाले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठsचे अनोखे उदाहरण न्यायिक क्षेत्रात उभे राहिले आहे.