
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यातच आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलं होतं. जरांगे यांच्या भेटीदरम्यान न्यायमूर्ती शिंदे म्हणाले आहेत की, सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही. याबाबत ‘एबीपी माझा’ने वृत्त दिलं आहे.
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर न्यायमूर्ती शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “काही प्रमाणात मनोज जरांगे यांचं समाधान झालं आहे. चर्चेची पुढची फेरी मंत्रिमंडळाशी चर्चा केल्यानंतर होईल.”
जरांगे यांच्या भेटीतील ठळक मुद्दे काय होते, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता, शिंदे म्हणाले की, “काही गोष्टींना तत्वतः मान्यता दिली आहे. त्यावर जरांगे पाटील यांची काही मते आणि सूचना मांडल्या आहेत, त्या मंत्रिमंडळाला सांगण्यात येतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल.” हैदराबाद गॅझेटला तत्वतः मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
शिंदे समितीकडे जरांगे यांनी काय केली मागणी?
मराठा आरक्षणासाठी हैदराबाद, सातारा गॅझेटचे कायद्यात रूपांतर करा, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाकडे केली आहे. तसेच सगळ्या मराठा बांधवाना उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या सूचना घेऊन शिंदे समितीचे सदस्य आता मंत्रिमंडळ उपसमितीची भेट घेणार आहेत. यानंतर यावर पुढील चर्चा केली जाणार, असं शिंदे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.