मी लिहिती झाले! – ज्योती सुरेश आठल्ये

49

आयुष्यात मी कधी कथा लिहीन असे मला वाटलेच नव्हते. वास्तविक माझी आई उत्तम लेखिका होती. इतर अन्य छंद तिने संसार संभाळून जोपासलेदेखील होते. म्हणून ती मला नेहमी म्हणायची की, ‘नुसता संसार करू नकोस इतर पण छंद जोपास.’ उपयोगी पडतात ते आपल्याला! खूप वेगळा आनंद मिळतो. शिवाय तुझा नवरा तुला चांगला पाठिंबा देणारा आहे. त्याचा उपयोग करून घे. पण पालथ्या घडय़ावर पाणी! तिच्या सांगण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता.

परंतु जीवनात असा काही मोठा अकस्मात तडाखा मिळाला की, मी उन्मळून पडले. 16 मे 2009 साली धट्टकट्टे असलेल्या यांना इतका जबरदस्त हार्ट ऍटॅक आला की, ते बसल्या जागी गेले. माझ्याशी गप्पा मारत असताना. त्यामुळे काही दिवस गोंधळात, सावरण्यात गेले. शेवटी कामधाम टाकून मुले तरी किती दिवस घरात बसणार. अन् मग रुटिन चालू झाले अन् मग स्वामींच्या आशीर्वादाने सावरत गेले. अगदी मनापासून ठरविले, रडून भेकून, वाईट तोंड करून बसून मुलांना त्रास द्यायचा नाही, पण आता पुढचे आयुष्य कसे चालू करावे. याच विचारात असताना माझ्या मुलीने गुरगावला जॉब घेतला. तेव्हा आयपॅडवर पेपर वाचत असताना ‘कथा-पाठवा’ असे एका मासिकाने छापले होते. ते वाचून मला काय वाटले ते कळले नाही.एक गोष्ट लिहून पाठविली आणि ती छापून आली अन् मग कथालेखनाचा माझा जो हुरूप वाढत राहिला की, विचारता सोय नाही. गेली काही वर्षे मी लिहीत आहे. अशा वेळी कै. आईची खूप आठवण येते. एक छोटीशी गंमत सांगते, इथल्या भाजीवाल्यादेखील कांदे, बटाटे, कोथिंबीर हे शब्द शिक सांगते व म्हणते, मुंबईत आम्ही तुमची हिंदीच जास्त बोलतो. तेव्हा हे तीन शब्द तरी शीक! त्यावर तो हसतो आणि  विचारतो, ऑन्टी कांदे, बटाटे चाहिये क्या?असे वाटते की, मराठी लोकांनी इथे येऊन जम बसवावा. नाही तरी परदेशात आपण ऍडजस्ट करून घेतोच ना. म्हणजे मग खऱ्या अर्थाने आपल्या माय-मराठीचा सुगंध सर्वदूर पसरेल व मला लिहित राहता येईल. अर्थात स्वामींचा आशीर्वाद आहेच. त्यामुळे ही आवड, हा छंद चांगल्या तऱहेने जोपासला जाईल, असा विश्वास वाटतो.

आपली प्रतिक्रिया द्या