ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या वाटेवर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे माजी सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांचे छायाचित्र भाजपच्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबरीने झळकल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. पोस्टरवर कश्मीरमधून 370 कलम हटवल्याबद्दल सरकारचे आभार मानण्यात आले आहे. भिंदमध्ये भाजपच्या जिल्हा समन्वयकाने लावलेल्या पोस्टरमुळे ही शंका खरी ठरू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांच्यानंतर त्यांनीही सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेश काँग्रेसची सत्ता आल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र त्यांच्याऐवजी अनुभवी कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवले गेले. त्यामुळे शिंदे नाराज होते. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यातील शेतकऱयांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपद सोडल्यावरून पळपुटेपणाचा आरोप लावला होता. त्यावर शिंदे यांनीही काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे आणि काळाबरोबर पावले उचलावीत. तरच काँग्रेस टिकेल असा सल्ला देत काँग्रेसला घरचा आहेर दिला होता. या सगळय़ातून त्यांची नाराजीच दिसत होती. त्यानंतर दोनच दिवसांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा फोटो भाजपच्या पोस्टरवर दिसला.

कलम 370चे उघड समर्थन

मोदी सरकारने कश्मीरमधून 370 कलम हटवून जम्मू-कश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर टीका केली होती, मात्र ज्योतिरादित्य यांनी मोदी सरकारची भूमिका योग्य असून हा निर्णय राष्ट्रहिताचा असल्याचे सांगत समर्थन केले होते.