आधुनिक सुविधांयुक्त आदिवासी मुलींचे वसतिगृह उभारणार – ॲड.के.सी.पाडवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासी विद्यार्थिनींचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त आदिवासी मुलींचे वसतिगृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री ॲड .के.सी. पाडवी यांनी केले. पेठ रोड येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृह येथील नूतन इमारतीच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी आदिवासी विकासमंत्री पाडवी बोलत होते.

यावेळी पाडवी म्हणाले, आज भूमिपूजन झालेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाची सात मजली इमारत ही शहराच्या मध्यवर्ती भागात साकारणार आहे. या इमारतीची क्षमता 310 विद्यार्थ्यांची आहे. या इमारतीत पार्किंग सुविधा, गरम पाण्यासाठी सोलर सिस्टीम, अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका, जेवणासाठी स्वतंत्र भोजनालयाची सुविधा व प्रत्येक मजल्यावर दोन वॉटर कुलरची सुविधा असणार आहे. या वसतिगृहासाठी एकूण रूपये 3 कोटी 10 लाख नियतव्यय मंजूर असून लवकरच सुंदर इमारत उभी रहाण्यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत असल्याचे, पाडवी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, नाशिकच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना, अपर आयुक्त आदिवासी विभाग गिरीष सरोदे, आदिवासी विभाग उपायुक्त सुदर्शन नगरे, ठाणे विभागाचे उपायुक्त आदिवासी प्रदिप पोळ, सहायक प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, आदिवासी विभाग धुळ्याचे कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, सहायक अभियंता आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग पंकजकुमार मेतकर आदिंसह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.