
मुंबई इंडियन्स संघाने गेल्या 13 वर्षांपासून पहिला सामना गमावण्याची परंपरा यंदा मोडीत काढली आणि रविवारी वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दारूण पराभव केला. या लढतीमध्ये शार्दुल ठाकूर याने मुंबईकडून पदार्पण केले. पदार्पणाच्या लढतीतच त्याने आपली छाप सोडली आणि तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या या दमदार कामगिरीचे हिंदुस्थानचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी भरभरून कौतुक केले. फलंदाज शार्दुलला हलवा समजतात अन् हीच बाब त्याच्या पथ्यावर पडते, असे श्रीकांत म्हणाले.
मुंबई इंडियन्ससाठी पदार्पणाच्या सामन्यात शार्दुल ठाकूरने 4 षटकांत 39 धावा देऊन 3 महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे मुंबईला केकेआरच्या धावसंख्येवर लगाम घालता आला. केकेआरला अजिंक्य रहाणे आणि फिन अॅलन यांनी दमदार सुरुवात करून दिली होती. पहिल्या 5 षटकात केकेआरने 69 धावा चोपल्या. केकेआरची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू असताना शार्दुलने केकेआरच्या तीन आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडले. यामुळे केकेआरचा संघ 20 षटकात 220 धावांपर्यंच पोहोचू शकला.
शार्दुलच्या कामगिरीबाबत बोलताना श्रीकांत म्हणाले, त्याने सुरुवातीची तीन षटके उत्कृष्ट टाकली. सर्व फलंदाज त्याला ‘हलवा’ गोलंदाज समजण्याची चूक करतात. तो सोपा गोलंदाज आहे असे समजून फलंदाज त्याला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात आणि बाद होतात. विशेषतः त्याने ज्या पद्धतीने कॅमेरून ग्रीनला बाद केले, ते मला खूप आवडले.”
शार्दुल ठाकूरने सर्वांना आश्चर्यचकित केले. असे नाही की तो खूप घातक गोलंदाजी करत आहे, परंतु तो आपल्या मर्यादा ओळखून गोलंदाजी करत आहे आणि फलंदाजांच्या चुकीची वाट पाहत आहे. तो खरोखर ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा मानकरी होता. तसेच ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने देखील त्याला चांगली साथ दिली. त्यांच्यामुळेच केकेआरची धावसंख्या 250 पर्यंत न जाता 220 वर थांबली, असे श्रीकांत म्हणाले.


























































