
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे राज्यासह देशभरात थिएटर बंद आहेत. त्यामुळे चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आहे. या काळात अनेक मराठी चित्रपटांनी मात्र सातासमुद्रापार झेंडा रोवला असून राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय पुरस्कारांकर आपले नाव कोरले आहे. ‘काळ’ या मराठी चित्रपटानेदेखील परदेशात डंका वाजवला आहे. नुकताच हा चित्रपट रशियातील 50 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रशियात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.
प्रेम्स प्रॉडक्शन कंपनी आणि नितीन वैद्य प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘काळ’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संकलन डी. संदीप यांचे आहे. या हॉरर पटात संकेत विश्वासराव, राजकुमार जरंगे, सतीश गेजगे, श्रेयस बेहरे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिखलीकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. गतवर्षी जानेवारीत राज्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच वेळी तानाजी हा चित्रपट रिलीज झाल्याने ‘काळ’ला बॉक्स ऑफीसवर फारशी कमाल दाखवता आली नव्हती. मात्र हा चित्रपट आता रशियात प्रदर्शित होणार असल्याने चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला आहे.
चित्रपटाच्या रशियावारीबद्दल दिग्दर्शक डी. संदीप म्हणाले, रशियात दरवर्षी मार्च महिन्यात बॉलिवूड फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला जातो. तिथे काळ चित्रपट पाठवण्यासाठी आमचे सहनिर्माते प्रेम्स प्रॉडक्शनने प्रयत्न केले. ट्रेलर पाहून रशियातील वितरकांनी हा चित्रपट तेथील स्थानिक भाषेत डब करून प्रदर्शित करण्याचे ठरवले. त्यानंतर गेल्या मार्च महिन्यात ’काळ’ची टीम रशियात गेली. 10 मार्चला मॉस्को आणि 12 मार्चला येकातेरिनबर्ग या शहरात चित्रपटाचा प्रीमियर झाला. 16 मार्चपासून रशियात हा चित्रपट 100 थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरले. पुढे ते म्हणाले, कोरोनामुळे अचानक रशियात लॉकडाऊन लागले, थिएटर बंद झाली. त्यामुळे तेव्हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. अखेर या गुरुवारपासून हा चित्रपट तिथल्या 50 स्क्रीनवर झळकला आहे.
‘काळ’च्या निमित्ताने फाऊंड फुटेज हा जॉनर मराठीत पहिल्यांदा हाताळण्याचा आम्ही प्रयत्न केला. राज्यात या चित्रपटाला फारसे यश मिळाले नसले तरी रशियात आमच्या चित्रपटाची दखल घेतली गेली, हा चित्रपट तिथल्या स्थानिक भाषेत डब करून प्रदर्शित केला जातोय ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.
– डी. संदीप, दिग्दर्शक



























































