मसालेदार…कबाब प्लॅटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीना आंबेरकर

आज आपण केवळ नॉनव्हेज रेसिपीज पाहणार आहोत त्याही थोडय़ाशा चटकमटक. चटपटीत रस्सा आणि कालवण आपण नेहमीच खातो. आज आपण पाहणार आहोत नॉनव्हेज प्लॅटर. बघुया काय असतं हे नॉनव्हेज प्लॅटर. त्यासाठी आपण कबाब हा प्रकार निवडला आहे. वेगवेगळय़ा पद्धतीचे नॉन-व्हेज कबाब.

kababa-1

खिमा कबाब

साहित्य…500 ग्रॅम खिमा, अर्धा कप हरभरा डाळ, 5-6 लसूण पाकळय़ा, अर्धा इंच आलं वाटून, दोन कांदे बारीक चिरून, मूठभर पुदिन्याची पाने व मूठभर कोथिंबीर बारीक चिरून, 1 चमचा लाल तिखट 1 चमचा गरम मसाला पावडर, मीठ चवीनुसार, तळणीसाठी तेल, दोन अंडी.

कृती…प्रेशर कुकरमध्ये खिमा स्वच्छ धुऊन घ्यावा. त्या हरभरा डाळ धुऊन घालावी. अर्धा वाटी पाणी घालावे. वाटलेले आले, लसूण, गरम मसाला पावडर, लालतिखट घालावे. प्रेशर कुकर बंद करून गॅसवर ठेवावा, पूर्ण प्रेशर आल्यावर गॅस बारीक करून 10 मिनिटे शिजू द्यावे व गॅस बंद करावा. खिम्यातील पाणी पूर्ण सुकवून घ्यावे. खिमा पूर्ण सुकल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटावा. वाटलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालावे. बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर, पुदिना व त्यात अंडी फोडून टाकावीत. मिश्रण एकजीव करावेत व लिंबाएवढे गोळे करून तेलाच्या हाताने त्याचे छोटे छोटे कबाब करावे व फ्राइंग पॅनमध्ये तेल सोडून शॅडो फ्राय करावेत किंवा कढईत तेल घालून तळून घ्यावेत, चटणी अथवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत. nargisi-kababa

नर्गिसी कबाब

साहित्य…खिमा अर्धा किलो, 6 अंडी उकडून, आलं-लसूण पेस्ट 2 चमचे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 2 वाटय़ा बेडक्रम्ज, तळण्यासाठी तेल.

कृती…प्रेशर कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून धुतलेला खिमा घालून परतून घ्यावा. आलं-लसूण लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून शिज्वून घ्यावा. शिजल्यावर खिम्यातील पाणी सुकवून घ्यावा व खिमा बारीक वाटून घ्यावा. खिम्याचे सहा भाग करावेत. अंडी सोलून घ्यावीत. खिम्याची एका भागाची वाटी करून त्यात अंडे घालावे. खिम्याच्या मिश्रणाने अंडे चारी बाजूंनी बंद करावे. चारीबाजूने कबाब ब्रेडक्रम्बसमध्ये घोळवावा व तेलात मंद गॅसवर गुलाबी रंगावर तळावा. असे सर्व कबाब तळून घ्यावेत. तळलेले कबाब उभे धरून त्याचे मधोमध दोन भाग करावेत. प्लेटमध्ये पालकाच्या पानावर अथवा कोबीच्या पानावर गोलाकार ठेवून कबाबच्या आतल्या अंडय़ाच्या पिवळय़ा भागावर थोडा थोडा टोमॅटो सॉस घालावा व सर्व्ह करावेत.

fish-egg

फिश एग कबाब

साहित्य…रोहू माशाचे तुकडे अर्धा किलो, बारीक चिरलेला कांदा 1, उकडलेले बटाटे पाव किलो, कोथिंबीर बारीक चिरून, मिरपूड अर्धा चमचा, मैदा 1 चमचा, 2 अंडी, ब्रेडक्रम्स अर्धी वाटी, तेल तळायला, मीठ, लिंबाचा रस.

कृती…रोहू माशाच्या तुकडय़ांना लिंबाचा रस लावून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. दोन वेगवेगळय़ा भांडय़ांत माशांचे तुकडे व बटाटे घालून उकडून घ्यावेत. माशांचे काटे काढून घ्यावेत व बटाटे सोलून घ्यावेत. माशांचा मांसल भाग व बटाटे एकत्र कुस्करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ, मीरपूड, कोथिंबीर एकत्र करावे. मैद्याचा हात लावून 10-12 लांबट आकाराचे कबाब तयार करावेत. प्रत्येक कबाब फेटलेल्या अंडय़ातून काढून सुक्या ब्रेडक्रम्समध्ये घोटवून दोन्ही बाजूनी फ्राय करावा. टोमेटो सॉसबरोबर खायला द्यावेत.