
कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रमिक जिमखान्याने आज आपल्या हीरक महोत्सवी सोहळ्यात काळालाच जणू थबकवले आणि सहा दशकांच्या आठवणींचा दरवळ पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात अलगद पसरला. श्रमिकच्या हाकेला प्रतिसाद देत अवघं कबड्डी विश्व या पावनभूमीत एकवटलं आणि श्रमिकच्या लाल मातीत लढलेल्या, जिंकलेल्या, झटलेल्या, धडपडलेल्या सर्व दिग्गजांच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला मानवंदना देत शनिवारची संध्याकाळ संस्मरणीय केली.
आमदार सुनील शिंदे यांच्या कल्पनेतून वरळीच्या अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तबेला मैदान ते श्रमिक जिमखान्याचा 60 वर्षांचा प्रवास ‘कबड्डी… कबड्डी…’च्या जयघोषात पुन्हा उभा राहिला. प्रत्येक दमात भूतकाळाचा ठाव होता… प्रत्येक श्वासात त्या मातीतल्या आठवणींचा स्पर्श होता.
ज्या लाल मातीत खेळाडूंनी आयुष्य झोपून दिलं, त्या मातीतून उचललेला कलश जेव्हा दिग्गजांच्या हाती सोपवला गेला, तेव्हा तो क्षण केवळ सन्मानाचा नव्हता… तो त्यांच्या घामाचा, त्यागाचा आणि आयुष्यभराच्या समर्पणाच्या अश्रूंनी न्हालेला मानाचा मुजरा होता. अमरप्रेम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राणाप्रताप तिवारी यांच्या हृदयस्पर्शी निवेदनाने वातावरणात दाटलेली भावना शब्दांच्या पलीकडे गेली आणि अनेकांच्या डोळ्यांत आठवणींचे थेंब चमपू लागले. या कार्यक्रमाची संकल्पना आमदार सुनील शिंदे यांची होती. यावेळी शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, ज्येष्ठ नेते, आमदार भास्कर जाधव, आमदार अजय चौधरी, आमदार महेश सावंत, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, नगरसेवक निशिकांत शिंदे, माजी महापौर महादेव देवळे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे माजी हॉकीपटू धनराज पिल्ले आदी उपस्थित होते.
मुंबईच्या कर्णधारांसह उद्धव ठाकरे यांचे भावस्पर्शी क्षण
मुंबईच्या कबड्डी इतिहासातील सुवर्णाक्षणांना उजाळा देताना, गेल्या सहा दशकांत संघाचे नेतृत्व करणाऱया महिला आणि पुरुष कर्णधारांसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी टिपलेले क्षण केवळ पह्टो नव्हते… ते तीन दशकांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासाच्या आठवणींना दिलेला एक जिवंत सलाम होता.
पहिले अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेटये, शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, राजू भावसार, अशोक शिंदे आणि ‘कबड्डीचा वाघ’ म्हणून ओळखले जाणारे वसंत सूद यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेला सत्कार हा केवळ गौरव नव्हता… तो त्यांच्या कर्तृत्वाला दिलेला मनःपूर्वक प्रणाम होता.
याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार विजेते, ज्येष्ठ खेळाडू, प्रशिक्षक, हाडवैद्य, पत्रकार आणि पडद्यामागे राबणारे असंख्य कार्यकर्ते यांचा सन्मान होताना ‘कबड्डी पुटुंब’ ही भावना अधिकच दृढ झाली. मैदान उभं करणाऱया हातांपासून ते खेळाला उंचीवर नेणाऱया खेळाडूंपर्यंत प्रत्येकाला दिलेला मान हा कबड्डीच्या अखंड प्रवासाचा सन्मान ठरला. हा सोहळा केवळ कार्यक्रम नव्हता… तो आपुलकीचा, जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा उत्सव होता.
जुन्या आठवणींमध्ये हरवले दिग्गज
श्रमिक जिमखान्यात पाऊल टाकताच कबड्डी स्वयंसेवकांनी प्रत्येकाच्या मनगटावर शिक्का मारत आणि हातात लिंबाच्या गोळय़ा देत स्वागत केलं… आणि क्षणात काळ मागे फिरला. हे दृश्य पाहून दिग्गजही बालपणीच्या आठवणीत हरवले. “स्टॅम्प इथे मारा… असं मारा…’’ म्हणत त्यांनी जुन्या दिवसांची उजळणी केली. दोन दशकांपूर्वीच्या मैदानातील तेच निरागस क्षण आज पुन्हा जिवंत झाले आणि वातावरणात एक वेगळीच ऊब पसरली.
कबड्डीच्या रणरागिणींच्या रॅम्प चढाईने जिंकली मने
श्रमिकच्या हीरक महोत्सवाला आधुनिकतेचा साज चढवताना मुंबईच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या महिला खेळाडूंनी नऊवारी साडीतील आगळीवेगळी रॅम्प चढाई सादर केली. नृत्यदिग्दर्शक गुरू कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता सुर्वे, लता पंटक, प्रतिमा मांजरेकर, जयश्री सुवर्णा, मनीषा गावंड, तृप्ती सुवर्णा, हिमाली नार्वेकर, हर्षदा नलावडे, दीपा पेडणेकर आणि सोनम पोळे या रणरागिणींनी “ए राजे जी र जी’’ या गीतावर केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने अक्षरशः जिंकली.
































































