माळरानावरील मोर आता बिनधास्त शेतात, नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडावल परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोर व लांडोरांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. मोरांची वाढती संख्या हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगली आणि पक्षी मित्रांसाठी आनंदाची बाब आहे. कोकणातही मोरांच्या संख्येत झपाटय़ाने वाढत होत आह़े  त्यामुळे कधीतरी माळरानावर दिसणारे मोर आता बिनधास्त शेतातही चरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हे जरी खरे असले तरी ते शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे.

कडावल परिसरात साधारण तीस वर्षांपूर्वी मोर अतिशय दुर्मिळ झाले होते. माळरानावर किंवा शेत शिवारात काही वेळा तुरळक प्रमाणात लांडोर चरताना दिसायचे. त्यांच्या कळपात मोर अभावानेच दिसत होते.  मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये मोर व लांडोरांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. पूर्वी वाडीवस्तीपासून दूर माळरानावर दबकत चरत असलेले हे पक्षी आता थेट वस्तीच्या नजीक असलेल्या शेतातही बिनदिक्कतपणे चरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.

 शासनाने शिकारीवर कडक निर्बंध घातल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता शिकारीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. तसेच नवीन विचारसरणीच्या तरूंणामध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण झाल्यानेही शिकारीचे प्रमाण घटले आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांची बदललेली मानसिकताही या पक्षांच्या पथ्यावर पडली आहे. या पक्षांची हत्या न करण्याचे पूर्वापारपासून चालत आलेले नियम काही गावांमध्ये आजही पाळले जात आहेत. त्यामुळेही या पक्षांच्या संख्येत पूर्वीच्या तुलनेत अनेक पटींनी वाढ झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. मात्र पक्षांचा हा राजा आता शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करू लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.