कागल – हायटेन्शन तार अंगावर पडल्याने माय-लेकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हायटेन्शन विद्युत तार अंगावर पडल्याने विजेचा धक्का बसून माय-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना कागल तालुक्यातील बाचणी येथे मंगळवारी सकाळी घडली असून, एक मुलगी वाचली आहे.

गीता गौतम जाधव (वय 32) व हर्षवर्धन गौतम जाधव (वय 14) अशी मृतांची नावे असून, भक्ती गौतम जाधव (वय 12) ही वाचली आहे. तिच्यामुळेच या घटनेची माहिती घरी समजली.

गीता जाधव या हर्षवर्धन आणि भक्ती या आपल्या दोन मुलांसह ओढय़ावर धुणे धुऊन परतत होत्या. याच वेळी त्यांच्या अंगावर हायटेन्शन विद्युत तार पडली. आईला विजेचा धक्का बसल्याचे बघून हर्षवर्धन त्यांना वाचविण्यासाठी गेला. मात्र, त्यालाही विजेचा धक्का बसला. परिणामी, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून भेदरलेल्या भक्तीने घरी धाव घेत हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. घटनेची माहिती समजताच कागल पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्यानंतर उशिरा शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी कागल पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.