
अलोट जनसागराच्या साक्षीने चैतन्याने भारलेल्या शिवमय वातावरणात अंगावर रोमांच उभा करणाऱया तरुणाईच्या सळसळत्या शिवभक्तीच्या जयघोषात आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱया दिमाखदार रोषणाईत मुरगूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा साजरा झाला.
मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात मंडलिक युवा प्रतिष्ठान व पालिकेच्या वतीने उभा केलेल्या अश्वारूढ शिवपुतळ्याचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात व शोभायात्रेच्या अमाप उत्साहात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते, तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांच्या प्रमुख उपस्थित सोहळ्याचे लोकार्पण झाले.
‘सोहळा अभूतपूर्व… सोबतीला युवा सर्व’ ही टॅगलाईन घेऊन ऍड. वीरेंद्र मंडलिक यांनी जिह्यातील सुमारे 1800 तरुण मंडळांना दिलेले निमंत्रण आणि त्याला हजारो शिवभक्तांनी दिलेल्या प्रतिसादाने मुरगूड जणू शिवतीर्थ बनले होते. ऍड. वीरेंद्र मंडलिक यांच्या नेटक्या संयोजनाखाली बाजारपेठेतून निघालेली शोभायात्रा, मुस्लिम बांधवांनी भगव्या झेंडय़ासह शहरातून काढलेली दुचाकी रॅली, चौकाचौकांत शिवभक्तांसाठी शहरवासीयांनी केलेली मोफत अन्नछत्राची सोय, साहिल मुल्लाची शिवगर्जना आणि श्रीकृष्ण पवार या युवकाने म्हटलेली शिववंदना अशा अभूतपूर्व वातावरणाने शहराच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा ऐतिहासिक सोहळा बनला.
कार्यक्रमात अश्वारूढ पुतळ्याच्या मुख्य शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के (पुणे), छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची 25 वर्षे सेवा करणारे धोंडीराम परीट व संयोजन समितीचे प्रमुख ऍड. वीरेंद्र मंडलिक यांचा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, अतुल जोशी, हर्षल सुर्वे, शेखर मंडलिक, संभाजी भोकरे, यशोवर्धन मंडलिक, समरजित मंडलिक, ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके, युवराज पाटील, सुरेश कुराडे, भय्या माने, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार उपस्थित होते.
शिवशोभायात्रा लोकार्पण सोहळ्याचे मुख्य आकर्षण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी मुरगूड शहराच्या मुख्य बाजारपेठेतून शिवशोभायात्रा काढण्यात आली. सुमारे मैलभर लांबीच्या या शोभायात्रेत शिवकालीन वेशभूषेत छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या 15 घटनांचे सादरीकरण करण्यात आले. जय शिवराय एज्युकेशन संस्थेच्या 31 शाळांनी शोभायात्रेचे संयोजन केले होते.



























































