
औरंगजेबासंदर्भात मोबाईलवरील स्टेटसवरून कोल्हापुरात उसळलेल्या दंगलीनंतर जिह्यात अजूनही अशा स्टेटसवरून तणाव निर्माण होताना दिसत आहे. रविवारी रात्री कागलमधील एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.
दरम्यान, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याने पोलिसांनीही तातडीने तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई केली. यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आज पुकारलेला ‘कागल बंद’ मागे घेण्यात आला.
राजर्षी शाहू महाराजांची जनकभूमी असलेल्या कागल शहरात रविवारी रात्री एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस मोबाईलवर ठेवले होते. त्याचे पडसाद उमटू लागताच त्याने लगेच ते बंद केले. मात्र, त्याचे क्रिन शॉट व्हायरल झाल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. कागल पोलिसांनी तातडीने तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई केली. दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज कागल शहर बंदचे आवाहन केले होते. पोलिसांनी रविवारी रात्री बारा वाजता बैठक घेत बंद मागे घेण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कागल बंदची देण्यात आलेली हाक मागे घेण्यात आली. त्यामुळे सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. कागलमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


























































