पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे बँकांचा कर्जवसुलीचा तगादा, शासन झोपलंय का?… आमदार कैलास पाटील संतापले

अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आपला संसार सावरत असताना, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवून बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. कळंब तालुक्यातील संजीतपूर येथील शेतकऱ्यांना येरमाळा शाखेतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेने कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

शासनाचे आदेश एकीकडे आणि बँकांची मनमानी दुसरीकडे शेतकरी नेमकं कुणावर विश्वास ठेवावा? असा सवाल आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कोणतीही नवी नोटीस पाठवू नये, असे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले होते. असे असताना सुद्धा कर्ज वसुली करिता शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्याचे चालू आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीच्या शेतकऱ्यांच्या जखमा अजूनही सुकलेल्या नाहीत. शेती उद्ध्वस्त झाली, जनावरे वाहून गेली, संसार उद्ध्वस्त झाला आणि अशा परिस्थितीत बँकांनी कर्ज फेडण्यासाठी नोटीस पाठवल्याने तर रजाकारशाही असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

संयमाची परीक्षा घेऊ नका

शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवून, कर्ज फेडण्याचा दबाव टाकला जातोय. आम्ही शांत आहोत म्हणजे कमजोर नाही. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नोटिसांच्या होळीचा इशारा

शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी थेट इशारा दिला आहे की, जर बँकांनी त्वरित कर्जवसुली थांबवली नाही, तर या बेकायदेशीर नोटिसांची होळी करण्यात येईल. प्रशासन जर बँकांवर नियंत्रण ठेवू शकत नसेल, तर अशा प्रशासनाचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी केला.