सुवर्णकन्या कजोल गुरवचे राजापूरात उत्स्फुर्त स्वागत, विविध संघटनांच्या वतीने सत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई पॉवर लिफ्टींग सिनिअर स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून सुवर्णपदक पटकावत राजापूरसह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकविणाऱ्या कजोल गुरव हिचे मंगळवारी सायंकाळी राजापूरात आगमन झाले. यावेळी तीचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि विविध संघटनांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. राजापूरची सुकन्या आणि मध्यरेल्वेची खेळाडू असलेल्या कजोल हिने नुकत्याच झालेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावताना सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

या स्पर्धेनंतर तिचे राजापूरात आगमन झाले. यावेळी जवाहरचौक येथे शिवस्मारकाजवळ तिचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी पंचारती ओवाळून औक्षण केले. कजोल हिच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संघटनांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कजोल हिने या स्पर्धेतील सहभाग आणि त्यात मिळविलेले यश याविषयी सांगितले. तर या स्पर्धेसाठी विविध माध्यमातून सहकार्य करणाऱ्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या यशामध्ये आपले कुटुंब, भाऊ प्रतिक आणि राजापूर वासियांचे आशिर्वाद यांचा मोठा वाटा असल्याचे तीने नमूद केले. यावेळी तिचे अभिनंदन करताना तिला ऑलिंपिक स्पर्धेच्या सहभागासाठी शुभेच्छा दिल्या.