
मुंबईकर क्रिकेटपटूंच्या आवडत्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेची फटकेबाजी येत्या 10 मेपासून सुरू होतेय. या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 32 वर्षे देशाला अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू लाभले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळवली जाणारी आणि निवड चाचणीचा दर्जा लाभलेली ही स्पर्धा 31 मेपर्यंत आठ मैदानांवर रंगेल.
16 वर्षांखालील युवा क्रिकेटपटूंमध्ये खेळवली जाणारी ही 33वी कल्पेश गोविंद कोळी क्रिकेट स्पर्धा यंदा 16 संघांमध्ये होणार असून 4 गटांत त्यांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील संघ एकमेकांशी सामने खेळणार असून गटातील सर्वोत्तम संघ 27-28 मे रोजी होणाऱया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. तब्बल 27 सामन्यांची ही स्पर्धा 10-11 मे, 17-18 मे, 24-25 मे, 27-28 मे आणि 30-31 मे या दिवशी खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा कांदिवली, विरार, अदानी मैदान (डहाणू), कलिना, माटुंगा, आरसीएफ चेंबूर आणि नवी मुंबई, नेरूळ या मैदानांवर होणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अभय हडप, तर पारितोषिक वितरण सोहळा अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या उपस्थितीत पार पडेल.
‘अ’ गटात, एमसीए अकादमी (ब), कल्याण केंद्र, भिवंडी-वांगणी केंद्र, माटुंगा केंद्र, तर ‘ब’ गटात आझाद मैदान केंद्र, वाशी केंद्र, एमसीए अकादमी (अ), पालघर-बोईसर केंद्राचा समावेश असेल. ‘क’ गटात कांदिवली केंद्र, विरार केंद्र (अ), मालाड केंद्र आणि कलिना केंद्र तसेच ‘ड’ गटात ठाणे केंद्र (अ), विरार केंद्र (ब), ठाणे केंद्र (ब), घाटकोपर केंद्र या संघांचा समावेश असेल.