कल्याण नगर मार्गावर अपघात, भरधाव गाडीने पाच मजुरांना चिरडलं; तीन मृत्युमुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या गाडीने पाच मजुरांना चिरडल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण दगावले असून उर्वरित जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी आणि मृत मजूर हे शेतमजूर असल्याची माहिती आहे.

जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत मजुरांची नावं आहेत. गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नगर – कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरात पाच शेतमजूर मध्यप्रदेश येथून आले होते. मात्र आज संध्याकाळी शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी क्र एम एच 12 व्ही क्यू 8909 ही भरधाव वेगात होती. त्या गाडीने या पाच मजुरांना जोरात धडक दिली त्यात ते चिरडले गेले त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर तिसऱ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

कल्याण-नगर महामार्गावर गेल्या काही वर्षांत वर्दळ वाढली आहे. मात्र याच महामार्गाची गेल्या काही वर्षांपासून दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे.बेशिस्तपणे वाहतुकीमुळे अपघातांची मालिकाच सुरू आहे.