कल्याण, नागोठणे येथे कोविड सेंटरचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 कल्याण डोंबिवलीसह रायगड जिह्यातील नागोठणे येथील कोविड सेंटर आणि पालिकेच्या स्वॅब टेस्टिंग लॅबचे उद्या शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाजाने पाटीदार भवन येथे हे कोविड सेंटर उभे केले असून या ठिकाणी 200 ऑक्सिजन सुविधा आहे. तर कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या जागेत कोविड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये 100 ऑक्सिजनचे बेड, 84 नार्मल बेड व 10 सेमी आयसीयू बेड आहेत.  याशिवाय कोरोना चाचणीचे तत्काळ निदान व्हावे यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने गौरीपाडा येथे स्वतःची स्वॅब लॅब उभी केली आहे. या लॅबचे तसेच दोन्ही कोविड सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तर रिलायन्स पेट्रोकेमिकल्सने नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात उभारलेल्या 50 बेड्सच्या कोविड सेंटरचे यावेळी उद्घाटन होणार आहे.