
सार्वत्रिक निवडणुकीचे काम पारदर्शक, सुरळीत व विहित वेळेत पार पडावे यासाठी महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र या प्रशिक्षणादरम्यान डोंबिवलीच्या पवार पब्लिक स्कूलमधील ८० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. वारंवार सूचना देऊनही या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत दांडी मारल्याचे लक्षात येताच महापालिकेने या कामचुकार ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
निवडणुकीच्या कामकाजासाठी महापालिकेकडून शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांची निवडणूक काळात गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र या प्रशिक्षणादरम्यान डोंबिवली पूर्वेच्या पलावा परिसरातील पवार पब्लिक स्कूलमधील ८० कर्मचाऱ्यांनी गैरहजेरी लावली. महापालिकेने सूचना आणि आदेश देऊनही या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात निवडणूक कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली.
मतदान, मतमोजणीला हजर राहा
१५ जानेवारी मतदान व १६ जानेवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हजर राहण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. या काळात गैरहजर राहून आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिला आहे.




























































