
जय मलंग… श्री मलंग, हिंदूंची वहिवाट… हीच मलंगमुक्तीची पहाट अशा जयघोषाने आज मलंगगड दुमदुमून गेला. निमित्त होते माघी पौर्णिमेचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 1982 पासून मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. ही परंपरा अखंड सुरू आहे. या वर्षीही शिवसेना नेते, नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हर… हर… महादेव, शिवसेना जिंदाबाद अशा गगनभेदी गर्जना करत हजारो हिंदू भाविकांचे भगवे वादळ मलंगगडावर धडकले.
भगवे ध्वज खांद्यावर घेतलेले शिवसैनिक आणि वाहनांवर फडकणाऱ्या भगव्या पताका असे सर्वत्र भारावून टाकणारे वातावरण होते.‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ असा नारा देत सकाळपासूनच हिंदू भाविकांचे जथ्थे गडावर जाऊन मलंगबाबाच्या समाधीचे दर्शन घेत होते. पहाटे मलंगगडावर पालखी नेण्यात आल्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मलंगनाथांच्या समाधीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. मलंगगडावर हिंदूंची वहिवाट निर्माण करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. लोकांमध्ये जागृती व्हावी हाच या आंदोलनामागील हेतू असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. शिवसेनेसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह 16 हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने गडावर उपस्थित होते. यावेळी उपनेते अल्ताफ शेख, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार विश्वनाथ भोईर, रवींद्र फाटक, शांताराम मोरे, डॉ. बालाजी किणीकर, कल्याणच्या महापौर विनिता राणे, ठाणे महापौर नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अंबरनाथ नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, महानगरप्रमुख विजय साळवी, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, सभागृहनेता प्रकाश पेणकर, गटनेते दशरथ घाडीगावकर, परिवहन सभापती मनोज चौधरी, बाजार समिती सभापती कपिल थळे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, राजेंद्र देवळेकर, सचिन बासरे, रवी पाटील, जिल्हा महिला संघटक विजया पोटे, दिनेश देशमुख, भाईनाथ महाराज यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासाठीच आंदोलन
मलंगगडावरील मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. मात्र काही वर्षांपासून मलंगगडावर मुस्लिम समाजाने हे स्थान हाजी मलंग असल्याचा दावा केला आहे. याविरुद्ध हिंदू भाविकांनी हरकत घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी हे सर्वधर्मीय स्थळ असल्याचे मान्य केले. मात्र मुस्लिम समाज वक्फ बोर्डाचा हवाला देऊन हा दर्गा असल्याचे सांगत आहे. यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेने शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. ही परंपरा अखंड सुरू आहे. 16 फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
- सकाळी 5.30 वाजता दिंडी सोहळा
- सायंकाळी 6 वाजता मलंगबाबा समाधी पूजन,
- मुख्य आरती सोहळा.
- 70 ते 80 हजार भाविकांनी घेतले मलंगबाबांच्या समाधीचे दर्शन.
- उत्सव काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन हजार पोलीस तैनात.
- भाविकांच्या सोयीसाठी एसटीच्या 50, केडीएमटीच्या 22 बसेस.
- चार आरोग्य पथके.
- शिवसेनेच्या वतीने मोफत अन्नछत्र.



























































