मृत प्रिन्सीचे मुंडके नसलेले धड कल्याणच्या खाडीत सापडले

1059
death

टिटवाळा ऑनर किलिंग प्रकरणाचा बळी ठरलेल्या 22 वर्षीय प्रिन्सीचा मुंडके छाटलेले कमरेपासूनचे करचे धड मंगळवारी कल्याणच्या खाडीत सापडले. दोन दिवसांच्या अथक शोधानंतर अग्निशमन जवान आणि मच्छीमारांनी गाळात रुतलेले धड दुपारी बाहेर काढले. मात्र दुर्दैवी प्रिन्सीचे शिर अजूनही सापडलेले नाही.

आंतरजातीय प्रेमप्रकरण मंजूर नसल्याने मुलीची क्रूरपणे हत्या करणारा बाप अरविंद तिवारी पोलीस कोठडीत असला तरी तो तपासात सहकार्य करत नसल्याने या हत्याकांडाची नेमकी उकल अजूनही होऊ शकलेली नाही. मुलीच्या शरीराचा दुसरा भाग कल्याण खाडीत फेकल्याची कबुली दिली. यानंतर अग्निशमन जवान आणि कोळी बांधकांच्या मदतीने मंगळवारी दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र हाती काहीच लागले नाही. आज सकाळपासून पुन्हा शोध सुरू केला. यावेळी दुपारी 12 वाजता गणेशघाटपासून दोनशे मीटर अंतरावर गाळात रुतलेला मृतदेहाचा अर्धवट भाग सापडला. प्रिन्सीच्या मृतदेहाचे दोन तुकडे आधी पालिकेच्या रुग्णालयात ठेवण्यात आले होते. आज ते डीएनए तपासणीसाठी जे. जे. हॉस्पिटलला पाठकिण्यात आले. दरम्यान तिवारी तपासात सहकार्य करत नाही. गुरुवारीही शोधमोहीम घेतली जाणार आहे.

बाकीच्या मुली गमवायच्या नाहीत!

प्रिन्सीचा खून करण्याच्या आधी काही दिवस तिवारीने पत्नी आणि तीन मुलींना मूळ गावी उत्तर प्रदेशला पाठवले होते. त्याच्याकडून पत्ता आणि फोन नंबर घेऊन पोलिसांनी त्याच्या पत्नीशी संपर्क साधला. तिवारीने मुलीचा खून केल्याची माहिती दिल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कल्याणला येण्याबाबत सांगण्यात आले. मात्र एक मुलगी गेली. बाकीच्या मुली लहान आहेत. मला त्यांना गमवायचे नाही, असे म्हणत प्रिन्सीच्या आईने टाहो फोडला. दरम्यान कल्याणला येण्यासाठी आई आणि कुटुंबीय आज निघाल्याची माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या