‘सप्तश्रृंगी’तील चौथ्या मजल्यावरील घरमालकाला पोलिसांनी मध्यरात्री उचलले; नियम धाब्यावर बसवून काम केल्याने घडली दुर्घटना

सप्तश्रृंगी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घरमालक कृष्णा चौरासिया (40) याला कोळसेवाडी पोलिसांनी मध्यरात्री उचलले आहे. सोसायटी अथवा पालिकेची परवानगी न घेताच नियम धाब्यावर बसवून लादी बसवण्याचे काम केले गेल्याने स्लॅब कोसळून सहा जणांचा बळी गेल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. चौरासियाच्या विरुद्ध महापालिकेने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

कृष्णा चौरासिया आणि त्याचे कुटुंब श्री सप्तश्रृंगी इमारतीच्या चौथ्या माळ्यावर राहतात. कृष्णा यांनी घरात टाईल्स बसवण्याचे काम सुरू केले होते. या कामादरम्यान अचानक इमारतीचा स्लॅब कोसळला. यात नमस्वी शेलार, प्रमिला साहू, सुनिता साहू, सुजाता पाडी, सुशीला गुजर आणि व्यंकट चव्हाण या सहा जणांचा मृत्यू झाला. आज सकाळच्या सुमारास फॉरेन्सिक लॅबचे पथक या इमारतीमध्ये दाखल झाले या इमारतीमधील विटा, टाईल्स, मातीचे सॅम्पल घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

तात्पुरता निवारा नको, कायमचे पुनर्वसन करा !
दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने सप्तश्रृंगी इमारतीसह आजूबाजूच्या चाळींचा परिसर तातडीने रिकामा केला आहे. तसेच येथील रहिवाशांची कल्याणमधील नूतन ज्ञानमंदिर शाळेत तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली गेली आहे. अंगावर असलेला कपड्यांनिशी हे सर्व रहिवासी येथे राहत असून आम्हाला तात्पुरता निवारा नको, कायमस्वरूपी छप्पर द्या, अशी मागणी केली आहे.

सरकारने वाऱ्यावर सोडले
काही गंभीर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचाराची अवाचे सवा बिले आकारली जात आहेत. याबाबत माहिती दिली असता पालिका प्रशासन कानावर हात ठेवत आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला रुग्णालयात दाखल करण्याचे सोपस्कार करून वाऱ्यावर सोडले आहे का, असा सवाल दुर्घटनाग्रस्तांनी केला आहे. अरुणा विरणारायन यांच्यावरील उपचाराचे आतापर्यंतचे बिल 90 हजारांच्या घरात पोहोचले आहे.

उद्ध्वस्त ढिगाऱ्यात आठवणींचे काहूर
सप्तश्रृंगीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणारे निरंचर साहू हे सकाळी नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. त्यांच्या घरी त्यांची सासू आणि मेव्हणी ओडिसाहून दोन दिवसांपूर्वीच राहण्यासाठी आले होते. या घटनेत साहू यांची सासू, पत्नी व मेहुण्याचा मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्यांचा मुलगा क्लासला गेल्याने तो वाचला. आज सकाळी घटनास्थळी येऊन साहू यांचा मुलगा गणेश याने काही वस्तू आणि कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इमारतीचा उध्वस्त ढिगारा पाहून त्याच्या मनात आठवणींचे काहूर माजले.. आईच्या आठवणीने तो धायमोकलून रडू लागला.