
तमीळसह विविध भाषांमधील सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर करोडो रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी कन्नडचा जन्म तमीळ भाषेतून झाल्याचे विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे.
कमल हासन यांच्या ‘ठग लाइफ’ या सिनेमाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम चेन्नईत पार पडला. व्यासपीठावर उपस्थित असलेले कन्नड अभिनेता शिवराजकुमार यांच्याकडे पाहत कमल हासन म्हणाले, शिवराजकुमार म्हणजे दुसऱया राज्यात राहाणारे माझे कुटुंबच आहे. तुमची भाषा तमीळमधूनच जन्माला आली. त्यामुळे तुम्हीही त्याच गटात समाविष्ट होता, असे कमल हासन म्हणाले.
कर्नाटक रक्षण वेदिका आक्रमक
कमल हासन यांच्या विधानाविरोधात कर्नाटक रक्षण वेदिका ही संघटना प्रचंड आक्रमक झाली आहे. तुम्हाला कर्नाटकमध्ये सिनेमा चालवायचा आहे की नाही? तसे असेल तर कन्नडचा अपमान करणे थांबवा. जर तुम्ही असेच कर्नाटक आणि कन्नड भाषिकांविरोधात बोलत राहिलात तर तुमचे सिनेमे कर्नाटकात लावू देणार नाही, असा इशारा कन्नड रक्षण वेदिकेने दिला आहे.