कमलनाथ यांचा यू टर्न, आता वाजत-गाजत होणार ‘वंदे मातरम्’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या ताखेला होणारे ‘वंदे मातरम्’ न झाल्याने मोठा वाद झाला होता. ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या कमलनाथ सरकारने यावर यू टर्न घेतला असून वाजत-गाजत ‘वंदे मातरम्’चे गायन होईल असे जाहीर केले आहे.

मध्यप्रदेशमध्ये मंत्रालयात गेल्या 13 वर्षापासून महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची प्रथा रूढ झाली होती. परंतु राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ‘वंदे मातरम्’ झाले नाही, त्यामुळे कमलनाथ सरकारवर विरोधक तुटून पडले होते. परंतु आता सरकारने ‘वंदे मातरम्’ला अधिक आकर्षक करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सकाळी अकरा वाजता पोलीस बँडच्या धूनवर ‘वंदे मातरम्’ होईल असा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत आता ‘वंदे मातरम्’च्या गायनासाठी सामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे.

भाजपने साधला होता निशाणा
‘वंदे मातरम्’ बंद झाल्यानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला होता. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एकतर काँग्रेसला ‘वंदे मातरम्’ म्हणता येत नसेल किंवा राष्ट्रगीत गाण्याची त्यांना लाज वाटत असेल असा घणाघात केला होता. तसेच काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ म्हटले नाही तर वल्लभ भवनच्या आवारात जनतेसोबत मिळून मी महिन्याच्या प्रत्येक तारखेला ‘वंदे मातरम्’ म्हणेल असा इशाराही चौहान यांनी दिला होता.