कांदिवलीत महायुतीचाच उमेदवार निवडून आणणार; गटप्रमुख, शिवसैनिकांच्या बैठकीत निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-shivsena

कांदिवलीत महायुतीचाच उमेदवार निवडून आणणार असा निर्धार करण्यात आला. विभाग क्रमांक 2 मध्ये नुकतीच गटप्रमुख, शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मोठय़ा संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार निवडून यावा यासाठी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक 49 च्या नगरसेविका संगीता सुतार, समाजसेवक संजय सुतार यांच्या विभागात गटप्रमुख आणि शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, विभाग क्रमांक 2 चे उत्तर भारतीय प्रमुख ऍड. कमलेश यादव, विधानसभा संघटक अनिल भोपी, उपविभागप्रमुख ऍन्थॉनी पॉल, महिला विधानसभा संघटक गीता भंडारी, महिला शाखा संघटक संगीता कोळी, शाखाप्रमुख संजय घरत, ज्येष्ठ शिवसैनिक बाबू सुतार, शाखा समन्वयक विकास दसपुते आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

भांडुपमधून महायुतीचे उमेदवार रमेश कोरगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत आमदार सुनील राऊत, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार मनोज कोटक.

शिवसेना… शिवसेना…
रत्नागिरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी हजेरी लावली आणि कार्यकर्त्यांची मने जिंकली. रत्नागिरीतील मराठा मैदानावर झालेल्या सभेत दोघेही उपस्थित होते. ‘शिवसेना…शिवसेना…’ हे गीत सादर करून महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या अंगावर रोमांच उभा केला. अवधूत गुप्ते यांनी भगवा फडकवत वातावरण भगवेमय करून टाकले.

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.