कंगनाच्या बेकायदा बांधकामावर पालिकेने केलेली कारवाई योग्य की अयोग्य? शुक्रवारी हायकोर्टात निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱया अभिनेत्री कंगना राणावत हिने वांद्रय़ाच्या पाली हिल येथील बंगल्यात बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने तिचे बांधकाम जमीनदोस्त केले आहे. याविरोधात कंगनाने हायकोर्टात पालिकेविरोधात 2 कोटींचा दावा ठोकला आहे. कंगनाच्या बेकायदा बांधकामावर पालिकेने केलेली कारवाई योग्य की अयोग्य याचा निर्णय हायकोर्टात शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी होणार असून न्यायमूर्ती शाहरूख काथावाला हे याबाबतचा निकाल सुनावणार आहेत.

पालिका प्रशासनाची रीतसर परवानगी न घेताच कंगनाने आपल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केले. या बंगल्याची झाडाझडती घेतली त्यावेळी स्वच्छतागृहाच्या जागी ऑफिस थाटल्याचे तर जिन्याच्या खाली स्वच्छतागृह बांधल्याचे निदर्शनास आले. काम थांबवण्याची नोटीस बजावत नोटिसीला उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत पालिकेने कंगनाला दिली होती. मात्र या नोटिसीला कोणताही प्रतिसाद न दिल्याने पालिका प्रशासनाने तिच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करत बंगला तोडला. सदर कारवाई आकसापोटी करण्यात आली. तसेच पालिकेची कारवाई बेकायदा असल्याने आपल्याला पालिकेने नुकसानभरपाई म्हणून 2 कोटी द्यावेत अशी मागणी करत कंगनाने अॅड. रिझवान सिद्दीकी व अॅड. बिरेंद्र सराफ यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली.