
उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे एका मंदिराच्या परिसरात गोरक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. गोरक्षकाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला आहे.
ही घटना कानपूर देहात येथील ज्योतिष गावातील आहे. येथे राहणाऱ्या 52 वर्षांच्या राजेश द्विवेदी यांचा मृतदेह त्यांच्या घरासमोरील मंदिरात फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.
राजेशचा मुलगा अंकित याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे वडील गोरक्षक होते. ते जखमी आणि बेवारस जनावरांची देखभाल करत असत. त्यांच्यावर इलाज करत असत. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी गावातील काही जण बेवारस प्राण्यांना मारत होते. राजेश यांनी त्याचा विरोध केला होता.
त्यांनी व्हिडीओ बनवून पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी त्यांना गावातील काही साक्षीदारांसोबत पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. तत्पूर्वी त्यांचा मृतदेह मंदिरात लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्यांच्या कुटुंबाने त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.




























































