
कांता कलन हे नाव मुंबईकरांना आतापर्यंत माहित झाले आहे. 4 ऑगस्टच्या पावसात आपल्या घराची पर्वा न करता माटुंग्यातील मॅनहोलजवळ तब्बल 8 तास उभी राहून लोकांची सेवा करणारी ही रणरागिनी. निःस्वार्थ भावनाने पुढे आलेल्या कांता कलन यांना लाख मोलाची मदत मिळणार आहे. व्हॅल्युएबल एडुटेन्मेंट या कंपनीतर्फे कलन यांना 1 लाख 11 हजारांची मदत देण्यात येणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अमेय हेटे यांनी जाहीर केले आहे.
मुंबईत 4 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. बऱ्याच ठिकाणी परिस्थिती गंभीर झाली होती. माटुंग्यात ही अशाच प्रकारे पाणी साचले होते. परिस्थिती लक्षात घेता जवळच राहणाऱ्या कांता कलन यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नजीकचे मॅनहोलचे झाकण उघडले. हे झाकण उघडे राहिल्यास त्यात कोणीही पडून आपला जीव गमावू शकतो, हे या महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिने भर पावसात त्या मॅनहोलपाशी उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, माणसांना मार्गदर्शन करून मोठी जबाबदारी निभावली. दहा पंधरा मिनिटे नव्हे, तब्बल सात तास ही महिला याठिकाणी उभी राहिली.
कलन यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी मुंबईतील व्हॅल्युएबल एडुटेन्मेंट ही संस्था पुढे सरसावली आहे. ही मदत जाहीर करताना अमय हेटे म्हणाले की, या पावसात लोकांसाठी काम करत असताना कांताबाईच्या घराचे नुकसान झाले. शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील समोर आला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता संस्थेकडून त्यांना आर्थिक मदत देण्याचे आम्ही निश्चित केले.

























































