
बिहार विधानसभा आणि विविध राज्यांतील पोटनिवडणुकांत झालेल्या खराब कामगिरीवरून काँग्रेस नेत्यांत मतभेद निर्माण होताना दिसत आहे. मोठा राजकीय इतिहास लाभलेल्या काँग्रेसने निवडणुकीतील पराभवांना पक्षाचे ‘नशीब’ म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळेच देशातील जनताही काँग्रेसला प्रभावी पर्याय मानत नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल्ल यांनी स्वपक्षावरच केली आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत पत्र लिहून पक्षसंघटनेत वरपासून खालपर्यंत बदल करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्य़ा कपिल सिब्बल यांनी बिहारमधील खराब कामगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिहार निवडणूक आणि इतर पोटनिवडणुकांतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत पक्षाच्या वतीने अद्याप काहीच भूमिका मांडण्यात आलेली नाही. कदाचित पक्षाला सर्वकाही ठीक वाटत असावे आणि त्यांना हा पराभवही इतर पराभवांसारखा सामान्य वाटत असावा, असा टोला सिब्बल यांनी एका मुलाखतीत लगावला आहे.
काँग्रेसचे नेमके काय चुकतेय?
निवडणुकीत सातत्याने होणाऱ्य़ा पराभवाबाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ निघून गेली आहे. गेल्या सहा वर्षांत आत्मपरीक्षण केले नाही. आता तशी अपेक्षा बागळून उपयोग नाही. काँग्रेसचे नेमके काय चुकतेय? या महत्त्वाच्या विषयावरील उत्तर शोधण्याची पक्षाची इच्छा नाही. कारण काँग्रेस कार्यकारी समिती नामनिर्देशित सदस्यांचाच भरणा आहे. प्रत्येक संघटनेत संवाद आवश्यक आहे, असेही सिब्बल म्हणाले.
My interview in today’s Indian Express
We are yet to hear on recent polls… Maybe Congress leadership thinks it should be business as usual: Kapil Sibal https://t.co/paYyFYUEud via @IndianExpress
— Kapil Sibal (@KapilSibal) November 16, 2020
पक्षांतर्गत मुद्दे माध्यमांसमोर मांडायची गरज नव्हती – गेहलोत
काँग्रेसने आतापर्यंत अनेक वाईट दिवस पाहिलेत. 1969, 1977, 1989 व 1996 या वर्षांमध्ये पक्ष वाईट काळातून गेला. मात्र पक्षाने आपले धोरण, विचारधारा व नेतृत्वावरील विश्वासाच्या बळावर पुनरागमन केले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात यूपीएने 2004 मध्ये सरकार बनले. आताच्या या परिस्थितीतूनही काँग्रेस पक्ष निश्चितच बाहेर पडेल, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला आहे.
























































