
पूर्व उपनगरातील एका रस्त्यावर केबल टाकण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नगरसेवक कप्तान मलिक यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ असून त्यात कप्तान मलिक हे कामगारांना धमकावत व त्यांचे सामानदेखील जप्त करीत असतानाचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे अशाप्रकारे दादागिरी करणाऱ्या मलिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.
चार कामगार रस्त्यावर केबल टाकण्याचे काम करीत असताना कप्तान मलिक तेथे गेले आणि त्यांनी थेट खोदलेल्या खड्डय़ात उतरून कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी कामगारांची गचांडी पकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नाही तर तुम्हाला येथे काम करायला कोणी सांगितले, तुमच्याकडे या कामाचे वर्क ऑर्डर आहे का अशी विचारणा करीत परत येथे काम करताना कोणी दिसला तर हात-पाय तोडीन असे धमकावले. दरम्यान, भाऊ मंत्री झाले तर यांची दादागिरी सुरू झाली अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. कप्तान मलिक यांच्याविरोधात त्या कामगारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
अशी कामे होऊ देणार नाही
हा व्हिडीओ गेल्या डिसेंबर महिन्यातला आहे. त्याठिकाणी अनधिकृतपणे केबल टाकण्याचे काम सुरू होते. आदल्या दिवशी मी त्याठिकाणी जाऊन कामगारांना समज दिली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा काही कामगार केबल टाकण्याचे काम करताना आढळले. त्यांच्याकडे वर्क ऑर्डर मागितले असता त्यांना देता आले नाही. काही बडय़ा कंपन्या अशाप्रकारे बेकायदेशीरपणे केबल टाकण्याचे काम करीत असल्याने पालिकेला कोटय़वधीचा घाटा होत आहे. त्यामुळे यापुढेही अशाप्रकारे कोणी बेकायदेशीर काम करून पालिकेचे नुकसान करीत असेल तर खपवून घेणार नाही. माझ्यावर पोलिसांची कारवाई झाली तरी बेहत्तर, असे नगरसेवक कप्तान मलिक यांनी त्या व्हायरल व्हिडीओवर आपले मत व्यक्त केले.




























































