
कोरोनाच्या संकटात नागरिकांना बाहेर पडण्यावर मर्यादा आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी लागणारे बि-बियाणे व खते यांच्यापासून कोणाताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी शासन शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वाटपाचा या शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बि-बियाणे खते दिले जात आहेत, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
उंब्रज मंडळातील निगडी गावच्या शिवारात आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बि-बियाणांचे व खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळातही राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवण्यावर शासनाने भर दिला होता, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, या काळात महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दररोज हजारो क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक झालेला भाजी-पाला विविध माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत पोहचत होती, ही व्यवस्था चालू राहील ती केवळ शेतकऱ्यांमुळेच. आज कोरोना सोबतच राज्यात आलेल्या टोळधाड, हुमनी यांसारख्या आपत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कृषी विभाग जनजागृती करत आहे. त्यांनी सूचविलेल्या उपाययोजना शेतकऱ्यांनी राबविल्या पाहिजेत, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले.




























































