
कराड येथील नगरपालिकेने विशेष वसुली अभियान 2022-23 अंतर्गत करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वसुलीचे काम जोरात चालू केले आहे. यासोबत चालू आर्थिक वर्षाच्या अखेर 152 मिळकतींचे नळ कनेक्शन, 14 मिळकतींचे ड्रेनेज कनेक्शन कट करून 8 मिळकती सील केलेल्या आहेत.
नगरपालिकेची घरपट्टीची थकबाकी 21 कोटी 15 हजार असून, आज अखेर घरपट्टीची एकूण वसुली 14 कोटी 36 लाख 85 हजार इतकी झालेली असून, अद्याप 6 कोटी 63 लाख 30 हजार इतकी येणे बाकी आहे. पाणीपट्टीची थकबाकी 5 कोटी 88 लाख 23 हजार इतकी असून, आजअखेर पाणीपट्टीची एकूण 1 कोटी 79 लाख 35 हजार इतकी वसुली झालेली असून, अद्याप 4 कोटी 8 लाख 88 हजार इतकी येणेबाकी वसुली करावयाची आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची एकूण थकबाकी 10 कोटी 72 लाख 18 हजार इतकी आहे.
करवसुली विभागाने फेब्रुवारीपासूनच करवसुलीस सुरुवात केलेली होती. मिळकतधारकांना कर वेळेत भरण्यासाठी वारंवार सूचना दिल्या होत्या. तसेच डिसेंबर व जानेवारी महिन्यात जप्तीपूर्व नोटिसाही बजावण्यात आलेल्या होत्या. तरीही अद्याप ज्या मिळकतधारकांनी कर भरलेला नाही अशा मिळकतधारकांवर मार्च महिन्यात कारवाईला सुरुवात केली आहे. मिळकतधारकांनी लवकरात लवकर मालमत्ता कर व पाणीकर भरावा अन्यथा फ्लेक्स बोर्डवर नावे प्रसिद्ध करणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले आहे. ही वसुलीची कारवाई कर निरीक्षक उमेश महादर व विशेष वसुली अभियान 2022-23 अंतर्गत नेमून दिलेल्या 6 पथकांतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहे. मार्च महिना वर्षअखेर असल्यामुळे करवसुली विभाग हा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याने मिळकतधारकांनी कराची रक्कम 31 मार्चपूर्वी नगरपरिषदेत भरून सहकार्य करावे. जे मिळकतधारक 31 मार्चपर्यंत कर भरणार नाहीत अशा मिळकतधारकांची नावे थकबाकी रकमेसह 10 एप्रिलपासून फ्लेक्स बोर्डवर प्रसिद्ध करणार आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी नगरपालिकेकडून सायंकाळी 8 वाजेपर्यंत मालमता कर व पाणीपट्टी भरून घेण्याची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच, 31 मार्च रोजी रात्री 11 वाजेपर्यंत ही सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहे, याची सर्व मिळकतधारकांनी नोंद घ्यावी.
- उमेश महादर, कर निरीक्षक, कराड नगरपालिका


























































