
कारगीलमधील द्रास खोऱयात शुक्रवारी उणे 24.3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंद झाले. त्यामुळे द्रास हे जम्मू-कश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांतील सर्वाधिक थंड ठिकाण बनले आहे.
जम्मू-कश्मीर तसेच लडाखच्या कारगील जिह्यात 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी तसेच पाऊस पडेल असा अंदाज शुक्रवारी हवामान विभागाचे संचालक सोनम लोटस यांनी वर्तवला. याचा जोजिला, बनिहाल-रामबाण आणि मुगल रोड या परिसरांना सर्वाधिक फटका बसून येथील वाहतूक विस्कळीत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जम्मूच्या किमान तापमानात गुरुवारी रात्री हंगामातील सरासरीपेक्षा 0.9 अंशांची घट झाली व ते 8.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. जम्मू आणि कश्मीर या दोन्ही विभागांतील रहिवाशांना सूर्योदयानंतर थंड तापमानापासून दिलासा मिळाला.




























































