
दापोली तालुका मुख्यालयाच्या ठिकाणाहून कोडजाई पुलावरून पुढे साखळोली शिवाजीनगर गावतळे कडे जाणा-या मार्गावर कारीवणी नदीवर पुल आहे. या पुलाचा स्लॅब उखडून लोखंडी शिगा बाहेर आलेल्या आहेत. त्यात पुलावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून राहत असल्यामुळे स्लॅब उखडून स्लॅबबाहेर आलेल्या पाण्यातील शिगा दिसून येत नाहीत त्यामुळे या मार्गावर वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. असे असले तरी जिल्हा परिषद बांधकाम विभाग धोक्याची वाहतूक टाळण्यासाठी भराव टाकून मार्ग वाहतूक योग्य करण्याचे साध सौजन्य देखील दाखवत नाही.
दापोली तालुक्यातील साखळोली , शिवाजीनगर , गावतळे , असोंड , शिवनारी , रुखी , संगलट , कोंढे , फणसू आदी गावांकडे जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असलेल्या दापोली साखळोली शिवाजीनगर गावतळे मार्गावर कारीवणी नदी पुलावरील स्लॅब उखडून लोखंडी शिगा बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या महत्त्वाच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
            
		





































    
    





















