
बेकायदा वाळूची साठवणूक केल्याची भीती दाखवून कारवाई करणार नाही, असे सांगून त्या बदल्यात 50 हजारांची लाच घेणाऱया जत तालुक्यातील करजगी गावच्या तलाठय़ास सलग दुसऱयांदा लाचलुचपतच्या पथकाने जेरबंद केले.
बाळासाहेब शंकर जगताप (वय 57, रा. करजगी, ता. जत) असे लाचखोर तलाठय़ाचे नाव आहे. सांगलीच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. जगतापविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 7 जुलै 2014 रोजी जगताप याला खरेदी दस्ताची नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते.
जत तालुक्यातील करजगी गावामध्ये तक्रारदारांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. यासाठी त्यांनी वाळू आणली आहे. ही वाळू बांधकामासाठी आणलेली नसून, बेकायदा वाळूची साठवणूक केली आहे, असे सांगत कारवाई न करण्यासाठी तलाठी जगताप याने 50 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे सोमवारी तक्रार केली होती. तक्रारीनुसार विभागाने पडताळणी केली. त्यामध्ये तलाठी जगताप याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज जगताप याच्या घराच्या परिसरात सापळा रचून जगताप याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर तलाठी बाळासाहेब जगताप विरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, ऋषिकेश बडणीकर, अजित पाटील, सलीम मकानदार, सुदर्शन पाटील, रवींद्र धुमाळ, पोपट पाटील, सीमा माने, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी केली आहे.
10 हजार घेताना अडकला होता जाळय़ात
– तलाठी जगताप याला यापूर्वी 7 जुलै 2014 रोजी खरेदी दस्ताची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



























































