
सामना प्रतिनिधी। शिरोळ
शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त दर्शनासाठी आलेल्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडाल्याने मृत्यू झाला. दिनकर दत्तात्रय राव (वय १७) असे त्याचे नाव असून तो रायगड मधील कर्जतचा रहीवासी आहे.
दिनकर आई ,वडिल आणि जुळा भाऊ देवेंद्र व अन्य नातेवाईकांसह सकाळी ८ च्या सुमारास नृसिंहवाडी येथे आला होता. स्नान व भोजन करून ते औदुंबर येथे जाणार होते. हे सर्वजण स्नान करण्यासाठी कृष्णा नदीत उतरले. पण पाण्यात मासे जास्त आहेत असे वाटल्याने ते मंदिराच्या समोरील घाटावर स्नानासाठी गेले. तेथूनही ते मंदिराच्या उत्तरघाटावर लांब स्नान करण्यासाठी गेले. घरातील लोक स्नान तसेच जप करू लागले. तेंव्हा दिनकर व त्याचे भाऊ व नातेवाईक पाण्यात खेळू लागले. त्यावेळी येथील देवस्थानच्या शिपायाने त्यांना खोल पाण्यात जाऊ नका असे सूचित केले. मात्र थोड्या वेळाने खेळता खेळता दिनकर यांना पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला.
पाण्यात शोधशोध केल्यावर दिनकरचा मृतदेह सापडला.





























































