
कर्जत तालुक्यातील सीना धरण प्रथमच या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 6 वाजता 20 क्युसेकने विसर्ग सुरू झाला, तर दुपारी 12 वाजेपर्यंत त्यात आणखी अकरापट वाढ होऊन तो 220 क्युसेक झाला होता.
सीना धरणाचे पाणलोटक्षेत्र असलेल्या नगर तालुक्यातील जेऊर, शेंडी, नगर शहर परिसरातही गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. मे महिन्यात 22 दिवस अवकाळी पाऊस झाला, तर 27 मे रोजी अतिवृष्टी होऊन वालुंबा नदीला महापूर आला. ही नदी वाळकीमार्गे सीना नदीला मिळते. त्या महापुरामुळे सीना नदीतून धरणात मोठय़ा प्रमाणावर पाण्याची आवक झाली. याशिवाय जून महिन्यातही पाणलोटक्षेत्रात पाऊस झाल्याने सीना धरण प्रथमच जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच ओव्हरफ्लो झाले आहे.
सीना धरणाची पाणी साठवण क्षमता दोन हजार 400 दशलक्ष घनफूट आहे. या धरणातील पाण्यामुळे कर्जत तालुक्यातील 21 गावांतील सात हजार 672 हेक्टर, तर डाव्या कालव्याद्वारे आष्टी तालुक्यातील तीन गावांतील 773 हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळतो. हे धरण भरल्याने लाभक्षेत्रातील गावांतील शेतकऱ्यांच्या पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. लाभक्षेत्रातील शेतकरी यामुळे आनंदित झाले आहेत.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सीना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यासह धरणक्षेत्रातील वाढते पावसाचे प्रमाण पाहता, धरणातून सीना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रापासून दूर राहावे. नदीकाठी राहत असल्यास स्थानिक प्रशासनाने त्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.