
सामना प्रतिनिधी । मालवण
गेल्या महिन्यात मालवणच्या समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारा उडपी कर्नाटक येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्यावर पळून गेला होता. याबाबत मत्स्य विभागाने कारवाईचा प्रस्ताव मालवण तहसीलदारांकडे सादर केल्यावर पळून गेलेल्या एमएफव्ही- महिश्री (क्र. आयएनडी- केए- ०३-एमएम- ३७१५ या ट्रॉलरच्या मालक श्रीमती सुप्रिया रतनराज खारवी (रा. कोठेंश्वर व्हिलेज, ता. कुंदापूर, जि. उडपी, कर्नाटक) यांच्यावर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन १९८१ चा भंग केल्याप्रकरणी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून ट्रॉलरचा सागरी मासेमारी परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.
मालवणच्या समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारा उडपी येथील हायस्पीड ट्रॉलर ११ नोव्हेंबर रोजी मत्स्य व्यवसाय विभागाचे मत्स्य अधिकारी प्रदिप वस्त यांनी गस्तीनौकेद्वारे पकडून मालवण बंदरात आणला होता. मात्र रात्रीच्या वेळी हा ट्रॉलर पळून गेल्याने मत्स्य विभागाच्या कारवाईवर स्थानिक मच्छीमारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत मच्छीमारांनी तसेच शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त राजकुमार महाडिक यांना जाब विचारत पळून गेलेल्या ट्रॉलरवर कारवाईची मागणी लावून धरली होती. त्यानुसार मत्स्य विभागाने महाराष्ट्र मासेमारी नियमन अधिनियम १९८१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी पळून गेलेल्या उडपी येथील ट्रॉलरवर कारवाई करण्यासाठी अहवाल तयार करून तहसीलदारांना प्रतिवेदन सादर केले होते. यानंतर ट्रॉलर मालकांना सुनावणीच्या नोटिसा काढून तीन वेळा सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या वेळी ट्रॉलर मालक उपस्थित न राहिले नाही तसेच कोणतेही लेखी म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे अखेर महाराष्ट्र मासेमारी सागरी नियमन १९८१ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रॉलर मालक सुप्रिया खारवी यांना तहसीलदारांनी १० लाख रुपयांचा दंड ठोठावत ट्रॉलरचा मासेमारी परवाना रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय दिला आहे.


























































