सीमाभागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, महाराष्ट्रातील वाहनांचीही कडक तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधक

कर्नाटक राज्योत्सव आणि भाषावार प्रांतरचनेत जबरदस्तीने कर्नाटकात घुसडल्याच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारविरोधात मराठी भाषिकांकडून 1 नोव्हेंबरला पाळण्यात येणाऱया सुतक व काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात कानडी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून येणाऱया सर्व वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, काही कन्नाड संघटनांकडून मराठी भाषिकांचा ‘काळा दिन’ होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमाभागात वातावरण तणावपूर्ण असून, मराठी भाषिकही एकवटले आहेत.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मराठी भाषिक सीमालढा चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगाव येथे 1 नोव्हेंबरला सकाळी छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथून मराठी भाषिक काळी वस्त्र परिधान करून, काळे झेंडे घेऊन मूक सायकल फेरी काढणार आहेत. शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघणारी ही फेरी मराठा रंगमंदिरात येऊन येथे सभा होणार आहे. सीमाभागात बेळगावसह इतर गावांतही मराठी भाषिकांकडून काळादिनी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

दरम्यान, मराठी भाषिकांचा काळा दिन व कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर, तसेच चौकांमध्ये बंदोबस्तासाठी अडीच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.