
कर्नाटकमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी भाजप आणि जनता दल सेक्युलरने विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची मागणी करणारी नोटीस दिली आहे. विधानसभा अध्यक्ष खादर यांनी त्यांनी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी भाजपच्या 10 आमदारांना निलंबित केले आहे. भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ केला आणि गदारोळ घातला. त्यामुळे अध्यक्षांनी ही कारवाई केली. नंतर विधानसभेच्या बाहेर माजी मुख्यमंत्री एम. बसवराज बोम्मई यांच्यासह भाजप आमदारांनी आंदोलन केले. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन 3 जुलैला सुरू झाले असून ते 21 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्य सरकारकडून आयएएस अधिकार्यांच्या कथित गैरवापर होत असल्याचा आरोप करत भाजपच्या काही सदस्यांनी निदर्शने केली. तसेच गोंधळ घालत विधेयके आणि कागदपत्रांच्या प्रती फाडल्या आणि भिरकावल्या. यामुळे सभागृहात गोंधळ झाला. बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीच्या संदर्भात आयएएस अधिकाऱ्यांचा एक गट नियुक्त करण्यात आला होता. या प्रकरणी सरकार सनदी अधिकाऱ्यांचा गैरवापर करत असल्याचा आरोप भाजपने केला. या मुद्द्यावरून त्यांनी सभागृहात गोंधळ घातला.
कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांच्या निलंबनाबाबत अपील केले होते. मी तुम्हाला विनंती करतो की कर्नाटक विधानसभेच्या कार्यपद्धतीच्या नियमांच्या कलम 348 नुसार या सदस्यांना निलंबित करण्यात यावे. कर्नाटक विधानसभेच्या उरलेल्या सत्रापर्यंत त्यांच्या असभ्य आणि अनादरपूर्ण वर्तनासाठी आणि त्यांना सभागृहात प्रवेश करण्यापासून रोखण्यात यावे, असे त्यांनी प्रस्तावात म्हटले होते. त्यानंतर हा प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आला.
मतदानानंतर विधानसभा अध्यक्ष खादर यांनी गोंधळ घालणाऱ्या 10 आमदारांवर अधिवेशनाच्या उर्वरीत कालवधीसाठी निलंबित करण्याची कारवाई केली. आपण त्या 10 आमदारांवर असभ्य आणि अयोग्य वर्तनामुळे ही कारवाई करत असल्याचे खादर यांनी सांगितले. निलंबित आमदारांमध्ये डॉ सीएन अश्वथ नारायण, व्ही सुनील कुमार, आर अशोक, अराग ज्ञानेंद्र , डी वेदव्यास कामथ, यशपाल सुवर्णा, धीरज मुनिराज, ए उमानाथ कोटियन, अरविंद बेलाड आणि वाय भरत शेट्टी यांचा समावेश आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात खादर यांच्याविरोधात भाजप आणि जेडीएस अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत.




























































