
विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण वेदिके आणि बजरंग दलाने गुरुवारी सकाळी बंगळुरू महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. गणेशोत्सवावर कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या मुख्यालयातही घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी आंदोलनासाठी ट्रकमधून गणेशाची भव्य मुर्तीही आणली होती. कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत आंदोलक गाड्या भरभरून महापालिका मुख्यालयाबाहेर पोहोचले होते. कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात होता, त्याच पद्धतीने आपल्याला यंदाच्या वर्षी तो साजरा करायला मिळाला पाहिजे अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती.
तिसरी लाटेचा धोका अद्याप टळलेला नसल्याने आणि कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढण्याची भीती असल्याने कर्नाटक सरकारने उत्सवावर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांच्या आधीन राहून बंगळुरू महानगर पालिकेने 3 दिवस उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. कर्नाटकाच्या इतर भागात मात्र 5 दिवस उत्सव साजरा करण्याची परवानगी आहे. बंगळुरू महापालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी निर्बंधांसंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की ‘गणेशोत्सव 3 दिवसांपेक्षा जास्त काळ साजरा करता येणार नाही. मुर्ती घरी आणताना आणि विसर्जित करताना मिरवणुका काढण्यास परवानगी नसेल. ‘ घरातल्या गणपतीचे घरातच किंवा फिरत्या हौदात विसर्जन करावे असे आवाहनही गुप्ता यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही नियम घालून दिले असून एका वॉर्डात एकाच गणपतीला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठीही महापालिका आणि पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त द न्यूज मिनिटच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.




























































