यांचे डोके फिरले आहे! शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकच्या मंत्र्यांमध्ये जणू डोके फिरल्यासारखे बोलण्याची स्पर्धाच लागली असावी. कारण उपमुख्यमंत्री सवदी यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘लक्ष्मण’रेषा ओलांडल्यानंतर सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री गोविंद कार्जोळ हेसुद्धा बरळले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कर्नाटकचे असून महाराष्ट्रातील मराठी हे कानडीच असल्याचे बेताल विधान कार्जोळ यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त सीमाभाग केंद्रशासित करा, अशी मागणी केल्यानंतर कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी तर थेट मुंबईवरच दावा केला होता आणि मुंबई ही केंद्रशासित करा, अशी बाष्कळ बडबड केली होती.

महाराजांचे पूर्वज सोरटूरचे

सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री गोविंद कार्जोळ यांनी सवदी यांना मागे टाकले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातील होते असे हास्यास्पद विधान केले आहे. कार्जोळ तारे तोडताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकमधील गदग जिल्हय़ातील सोरटूर गावचे होते. कर्नाटकात दुष्काळ पडल्यामुळे शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी हे कानडीच असल्याचा दावा कार्जोळ यांनी केला आहे.