तुम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा अधिकार नाही, अभिनेता कमल हासन यांना कर्नाटक हायकोर्टाने फटकारले

कन्नड भाषेबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने फटकारले. तुम्ही भले कमल हासन असाल, पण तुम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने हासन यांची कानउघाडणी केली.

हिंदी भाषेची तमीळ भाषेमधूनच उत्पत्ती झाली आहे, असे विधान कमल हासन यांनी केले आणि वादाला तोंड फुटले आहे. त्यावरून हासन यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विरोधाच्या पार्श्वभूमीवर ‘ठग लाईफ’ या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत पार पडावे, यासाठी कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स व अन्य यंत्रणांना निर्देश द्या, अशी मागणी करीत कमल हासन यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी कमल हासन यांनाच फैलावर घेतले. हासन यांच्या वकिलांनी माफीबाबत भूमिका मांडण्यास वेळ मागितला. मात्र नंतर हासन यांनी माफी मागण्यास नकार देताना तूर्तास चित्रपटाचे प्रदर्शन करणार नसल्याचे न्यायालयाला कळवले.