
आयआयटी खडगपूरमधून शिक्षण पूर्ण केल्यावर त्याला अमेरिकेत मोठय़ा पगाराची नोकरी मिळाली. सहा वर्षे नोकरी केल्यावर आपलं खरं प्रेम शेतीवर असल्याची त्याला जाणीव झाली. मग कसलाही विचार न करता तो मायदेशी परतला. 20 गाई खरेदी करून त्याने डेअरी व्यवसायाला सुरुवात केली अन् आज तो वर्षाकाठी कोटय़वधींची कमाई करतोय. ही यशोगाथा आहे किशोर इंदुकुरी यांची.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या इंदुकुरी यांनी आयआयटी खडगपूरमधून पदवी मिळवल्यावर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेचटमधून पदव्युत्तर पदवी आणि पॉलीमर सायन्स अँड इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी मिळवली. शिक्षणानंतर अमेरिकेतच मोठय़ा पगाराची नोकरी मिळाली.
इंदुकुरी यांच्या कुटुंबियांची कर्नाटकात शेती आहे. यानिमित्ताने ते नेहमी शेतात जायचे, वडिलांशी चर्चा करायचे. आपलं खरं प्रेम शेतीवर असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी धाडशी निर्णय घेतला. अमेरिकेतील जॉब सोडून 2012 साली ते मायदेशी परतले. भेसळयुक्त दुधापासून लोकांची सुटका करण्यासाठी त्यांनी हैदराबादमध्ये येऊन दुधावर संशोधन केले अन् अवघ्या 20 गायींसह डेअरी व्यवसाय सुरू केला. 2016 साली ‘सिद्स फार्म’ नावाची कंपनी सुरू केली. आज ते दहा हजाराहून अधिक ग्राहकांना दररोज दूध पुरवतात. गतवर्षी त्यांनी 44 कोटी रुपयांची उलाढाल केली.

























































