
थेट परदेशी गुंतवणुकीत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत कर्नाटक प्रथम क्रमांकावर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. फडणवीस सरकारच्या अगोदरच्या कालावधीतही कर्नाटक असाच एकदा पुढे गेला होता. यशाचे श्रेय घेताना फडणवीस पुढे येतात तसेच अपश्रेयही पुढे येऊन घ्यावे, अशा शब्दांत काँग्रेस प्रवत्ते सचिन सावंत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. दाओसमध्ये जाऊन कोट्यवधी रुपयांचे करार केले. त्यामुळे रोजगार आणि थेट परदेशी गुंतवणूक वाढत असल्याचा दावा महायुती सरकार सतत करीत आहे, पण सचिन सावंत यांनी आकडेवारी सादर करून या क्षेत्रात महाराष्ट्राची कशा प्रकारे पिछेहाट होत आहे याचे पुरावेच दिले. त्यामुळे महायुती सरकारच्या दाव्याची पोलखोल झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारने एका वर्षाचा कॉम्प्युटर हार्डवेअर-सॉफ्टवेअर श्रेणीतील परदेशी गुंतवणूक जाणीवपूर्वक गुजरातला पाठवली तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र मागे गेला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार असताना महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे या तिमाहीतील सर्वाधिक गुंतवणूक देशात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात आली आहे. यातील बहुतेक गुंतवणूक ही कर्नाटकला गेलेली दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील रस्त्यांची पाहणी केली. हिंजवडीच्या आयटी पार्कच्या परिसरातील रस्त्यांची दुर्दशा पाहून अजित पवार संतापले होते. हिंजवडी आयटी पार्क परिसरात जाऊन महाराष्ट्राचे वाटोळे झाले. आपले आयटी पार्क बंगळुरूला चालले आहे असे अजित पवार यांनी म्हटले होते ते आता खरे होत आहे याकडे सचिन सावंत यांनी लक्ष वेधले.
एप्रिल-जून 2025 या तिमाहीतील गुंतवणूक
- कर्नाटक – 48,804 कोटी रुपये
- महाराष्ट्र – 45,921 कोटी रुपये
- तामीळनाडू – 22,902 कोटी रुपये
- गुजरात – 10,245 कोटी रुपये
- दिल्ली – 9,403 कोटी रुपये
- हरयाणा – 8,822 कोटी रुपये
- राजस्थान – 4,678 कोटी रुपये
- तेलंगणा – 3,380 कोटी रुपये
- उत्तर प्रदेश – 688 कोटी रुपये
- झारखंड – 25 कोटी रुपये