करंजा-रेवस लवकरच रो-रो सेवा मार्गी लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा

करंजा ते रेवस दरम्यान रो रो सेवा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. स्थानिक मच्छिमारांनी आक्षेप घेतल्याने करंजा-रेवस या रो-रो सेवेच्या जेट्टीचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद होते. मात्र आत्ता पुन्हा एकदा हे काम सुरू झाले असून मार्च 2019 पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करंजा रेवस या जलवाहतूकीने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.

रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाणी अलिबाग येथे जाण्यासाठी उरणकरांना रस्त्याने जाण्यासाठी 40 किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. तर जलमार्गाने छोट्या तरीने जीवघेणा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाकडून या मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. विशेषत: मुंबईतील जलसेवा बंद झाल्यानंतर अलिबागमधील नागरिकांकडून याच मार्गाचा पर्याय म्हणून अवलंब केला जातो. त्यामुळे ही जलसेवा महत्त्वपूर्ण आहे. अलिबाग येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे इंधन व वेळेची बचत व्हावी तसेच अलिबाग व उरणमधील अंतर कमी व्हावे यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने 19 कोटी रुपये खर्चाची करंजा तर रेवस बंदरातून 25 कोटींच्या खर्चाच्या या दोन बंदराच्या दरम्यान रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

या रो रोच्या जेट्टीसाठी निवडण्यात आलेल्या जागेमुळे कंरजा बंदरात नांगरण्यात येणाऱ्या मासेमारी बोटींवर परिणाम होऊन मच्छीमारांचे नुकसान होण्याच्या भीतीने करंजा येथील मच्छीमारांनी जेट्टीला विरोध केला होता. त्यामुळे हे काम रखडलेले होते. मात्र यामधून मेरिटाइम बोर्डाने मार्ग काढला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांच्याशी संपर्क साधला असता, करंजा जेट्टीच्या कामासाठी १९ कोटी उपलब्ध असल्याने त्याचे काम सुरू आहे. तर रेवस जेट्टीसाठी केंद्र सरकारकडे २५ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. हा निधी लवकरच उपलब्ध होऊन मार्च २०१९ पर्यंत ही सेवा सुरू होईल. अलिबाग हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असल्याने उरण तालुक्यातून या मार्गाने रोज हजारो प्रवासी हा धोकादायक प्रवास करत असतात. रोरो सेवेमुळे हा रोजचा जीवघेणा धोकादायक प्रवास बंद होणार असून रो रो सेवेमुळे प्रवाशांना आपली मोठ मोठाली वाहने देखील एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेता येणार असल्याने या प्रवासी सेवेबद्दल उरणच्या नागरिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय हा प्रवास किफायतशिर असल्याने प्रवाशांची अर्थिक बचत होणार आहे. रो-रो सेवेच्या बोट मध्ये मोठ मोठाल्या बस जात असल्याने या मार्गावर प्रवासी वाहतूक देखील वाढण्याची शक्यता असून दोन्ही विभागातील पर्यटनाला देखील चालना मिळण्याची शक्यता आहे. सध्या या रो-रो सेवेसाठी ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम जोरात सुरू असून ते जवळ जवळ पूर्णत्वास आले आहे. तर सेवच्या जेट्टटीच्या समांतर असलेल या ब्रेक वॉटर बंधारा समुद्रामध्ये 200 मिटर लांब आहे. सध्याची तरसेवा ही पावसाळयात अनिश्चित असते मात्र रो-रो- सेवा ही वर्षभर सूरू राहणार असल्याने प्रवाशांना अलिबागला जाणे सोयीचे होणार आहे. करंजा येथिल ब्रेक वॉटर बंधारा झाल्यास येथे मच्छिमारांना बोटी उभ्या करणे शक्य होणार आहे. तसेच येथे सर्व बोटींना पाणी, पेट्रोल-डिझेल भरण्याची सोय, स्वच्छतागृहे, प्रवाशांसाठी अत्याधुनिक निवारा शेड या सुविधा पुरविल्या जाणार आहेत.